अकोला : कुंभमेळामध्ये सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने प्रयागराज येथे जात आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांची सोय होण्याच्या दृष्टिने रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. नांदेड ते पटना आणि काचीगुडा ते पटना दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातून प्रयागराज येथे जाणाऱ्या भाविकांची मोठी सुविधा होणार आहे.
प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू असून पवित्र स्नान करण्यासाठी संपूर्ण देशातून करोडो भाविक येथे दाखल होत आहेत. विदर्भामधूनही मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज येथे जात असल्याने अकोलामार्गे थेट रेल्वे गाडी सोडण्याची मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेतली असून अकोलामार्गे दोन विशेष रेल्वे गाड्यांच्या चार फेऱ्या होणार आहेत. विशेष गाड़ी क्रमांक ०७७२१ नांदेड येथून २२ जानेवारी २३.०० वाजता सुटेल आणि पटना येथे तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०७७२२ पटना येथून २४ जानेवारी रोजी १५.३० वाजता सुटेल आणि नांदेड येथे तिसऱ्या दिवशी ०४.३० वाजता पोहोचेल. या विशेष गाडीला पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, जबलपुर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर आणि आरा येथे थांबा राहणार आहे. दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १६ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी व २ गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहील.
हेही वाचा…आता झाडे योरुबा भाषेत बोलणार! नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापकाचा…
विशेष गाडी क्रमांक ०७७२५ काचीगुडा येथून २५ जानेवारी रोजी १६.४५ वाजता सुटेल आणि पटना येथे तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०७७२६ पटना येथून २७ जानेवारी ११.३० वाजता सुटेल आणि काचीगुडा येथे तिसऱ्या दिवशी ७ वाजता पोहोचेल. या गाडीला निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर आणि आरा येथे थांबे राहणार आहेत. या गाडीला दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी, सात शयनयान, तीन सामान्य द्वितीय श्रेणी व एम गार्ड्स ब्रेक व्हॅन राहील. या गाड्यांच्या वेळापत्रक व थांब्यांची अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.