अकोला : वाशीम जिल्हा प्रशासनाची अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२४-२०२५ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा झाली असून त्यात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय यश प्राप्त झाले. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी ‘मिशन डबलिंग फार्मर्स इन्कम’ या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांना ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे, तर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी कार्यालयीन व्यवस्थापन, अभिलेख कक्ष सुधारणा आणि पोलीस कल्याणकारी योजनांसाठी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला.
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘मिशन डबलिंग फार्मर्स इन्कम’
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन चिया सीडच्या उत्पादनाचा नाविन्यपूर्ण प्रयोग, नरेगा योजनेतून सिंचन विहिरींची निर्मिती आणि सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर दिला. या प्रभावी उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली असून, वाशीम जिल्ह्याने राज्यभरात आपली छाप उमटवली आहे.
कार्यालयीन व्यवस्थापन, अभिलेख कक्षाची सुधारणा
वाशीम पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी कार्यालयीन व्यवस्थापन, अभिलेख कक्षाची सुधारणा आणि पोलीस कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळवला. त्यांना ६ लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले असून, ही रक्कम कार्यालयीन सुधारणा आणि नव्या प्रकल्पांसाठी वापरली जाणार आहे. या यशाने पोलीस दलाच्या समर्पणाचेही कौतुक झाले आहे. जिल्ह्याचा गौरव या दुहेरी यशामुळे जिल्हा राज्याच्या नकाशावर झळकला आहे.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने दाखवलेली कार्यक्षमता आणि लोककल्याणकारी दृष्टिकोन यामुळे वाशिमवासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशात उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) कैलास देवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) रविंद्र सोनुने यांच्या उल्लेखनीय कार्याचा आणि सहकार्याचा मोलाचा वाटा आहे. हे यश जिल्ह्याच्या प्रगतीचा पाया मजबूत करणारे ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत आदी उपस्थित होते.