अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या व कुटुंबीयांकडे एकही वाहन नाही. त्यांच्यावर कुठलेही कर्जदेखील नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या जंगम व स्थावर मालमत्तेमध्ये पाच वर्षांत वाढ झाली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून ॲड. आंबेडकर यांनी शनिवारी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण जाहीर केले. ॲड. आंबेडकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ४५ लाख ९२ हजार १२३ रुपये, पत्नीकडे १ कोटी १७ लाख ८६ हजार ९७२ रुपये आणि मुलाकडे ४५ लाख ६४ हजार ०३४ रुपये अशी एकूण २ कोटी ०९ लाख ४३ हजार १२९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
हेही वाचा : धक्कादायक! दहा वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकून त्वचा सोलली…
ॲड. आंबेडकर व त्यांचे पूत्र सुजात आंबेडकर यांच्याकडे प्रत्येकी १५० ग्रॅम सोने आहे, तर पत्नी प्रा. अंजली आंबेडकर यांच्याकडे २०० ग्रॅम सोने असून त्याची एकूण किंमत ३९ लाख ८२ हजार ८०० रुपये दाखविण्यात आली आहे. २०१९ मध्ये ॲड. आंबेडकर कुटुंबाकडे एकूण १ कोटी २५ लाख २२ हजार ९१६ रुपयांची जंगम मालमत्ता होती. त्यांच्या जंगम मालमत्तेत पाच वर्षांमध्ये ८४ लाख २० हजार २१३ रुपयांनी वाढ झाली. एकूण स्थावर मालमत्ता ७ कोटी १७ लाख ५५ हजार १०४ रुपयांची आहे. यापैकी स्वत: ॲड. आंबेडकर यांच्या नावावर ३७ लाख, वडिलोपार्जित संपत्तीतील हिस्सा १ कोटी २८ लाख रुपये आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर २ कोटी ५२ लाख ५५ हजार १०४ रुपये आणि मुलाच्या नावावर वडिलोपार्जित हिस्सातील ३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांची एकूण स्थावर मालमत्ता ४ कोटी ६२ लाखांची होती. ॲड. आंबेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाकडे एकही वाहन नसून कुठलेही कर्ज नाही.