अकोला : शहरातील कृषी नगर भागात एका शाळेसमोरून १२ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल झाली. वंचित बहुजन आघाडीच्या एका महिला नेत्याची ती नात असल्याने ‘वंचित’ने आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण्यातच आंदोलन केले. शहरातून शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अपहृत मुलीचा शोध घेण्यासाठी धावपळ केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाला खडकी परिसरात मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास मुलगी आढळून आली. तिला कुटुंबियांकडे सोपविण्यात आले असून, सत्य मात्र वेगळेच समोर आले.
शहरातील कृषी नगर भागात एका नामांकित शाळेच्या समोरून सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी संशयित पाच ते सहा जणांची नावे पोलिसांकडे सोपविली होती. त्या दिशेने पोलीस तपास सुरू झाला. शाळकरी मुलीच्या अपहरणाची जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गंभीर दखल घेत तपास यंत्रणांना निर्देश दिले. पोलिसांची पथके गठित करून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर पोलिसांनी अपहृत मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखा व सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. शाळेत जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.
महिला नेत्याच्या नातीच्या अपहरणाची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात धाव घेत तपास करण्याची मागणी केली. यावेळी ठिय्या देखील दिला. तपासासाठी पोलिसांचे दोन पथके गठीत करण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचा तपास ठरला महत्त्वपूर्ण
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाला मुलगी शिवणी बायपासजवळ खडकी परिसरात एका रस्त्यावर मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास आढळून आली. तिला ताब्यात घेऊन कुटुंबीयांकडे सुखरुप सोपविण्यात आले. शाळकरी मुलगी रागाच्या भरात शाळेत गेली होती. आता परत घरी गेले तर पालक रागावतील या भीतीने मुलगी शाळेतून निघून गेली होती. त्यानंतर रस्त्याने भटकंती करत असतानाच सुदैवाने पोलीस पथकाला ती आढळून आली. मुलगी सुखरूप असल्याचे पाहून पोलीस, कुटुंबियांसह सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. शाळकळी मुलीच्या अपहरणाची सर्वत्र चर्चा असताना सत्य मात्र वेगळेच समोर आले.