अकोला : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दृष्टीने चांगले वातावरण आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘किंग’ किंवा ‘किंगमेकर’च्या भूमिकेत निश्चित दिसतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना सचिव तथा प्रवक्त्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी आज येथे केले.
महायुतीच्या प्रचारासाठी आल्या असता त्यांनी अकोल्यात शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुती व मविआमध्ये लढत होत आहे. महायुती सरकारने जनहितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. सर्वसामान्यांसाठी प्रभावी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा सकारात्मक प्रभाव पडल्याने राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडीच कोटी महाराष्ट्रात बहिणी आहेत. या योजनेतून महिलांच्या सक्षमीकरणाचे काम झाले. अनेक महिलांना आपली आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी योजनेतील लाभ उपयोगाचा ठरला. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मुख्यमंत्री आपले लाडके भाऊ वाटत असून त्या निवडणुकीत निश्चितपणे त्यांच्या पाठीशी राहतील, असा विश्वास डॉ. कायदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : सत्तेत आल्यास सोयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव…रणदीप सिंग सुरजेवाला यांची घोषणा…
लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या परंपरागत जागांवर शिवसेनाच लढली पाहिजे, असा पक्षाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह होता. त्यामुळे महायुतीत शिवसेना शिंदे गटाला सन्मानजनक ८३ जागा मिळाल्या आहेत. या जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार लढत असून आम्हाला किमान ६३ जागांवर विजय होण्याची अपेक्षा आहे. जागा निवडून आणण्याची सर्वाधिक सरासरी शिवसेनेची असेल, असे देखील त्या म्हणाल्या.
मुंबई, ठाण्याच्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण वेगळे आहे. शिवसेनेला सर्व भागात संघटनात्मक बळकटी मिळण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पक्ष विदर्भात लढत असलेल्या जागांवर देखील चांगला स्पर्धेत असून निश्चित या भागात देखील शिवसेनेला यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : “राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
काही तडजोडी स्वीकाराव्या लागतात
महायुतीमध्ये प्रमुख तीन पक्षांनी एकत्रित निवडणूक लढण्यासाठी काही तडजोडी स्वीकाराव्या लागतात, असे डॉ. कायंदे म्हणाल्या. बाळापूरमध्ये पक्षाकडे सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळे संपर्कात असलेले भाजप पदाधिकारी बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी देण्यात आली. भावना गवळी लोकांमधून निवडून येत आजपर्यंत लोकप्रतिनिधी राहिल्या आहेत. विधान परिषदेची आमदारकी त्यांचा पिंड नाही. त्यामुळेच रिसोड मतदारसंघातून त्या विधानसभेची निवडणूक लढत आहेत, असे देखील डॉ. मनिषा कायंदे यांनी स्पष्ट केले.