अकोला : रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा बिगुल लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच वाजला आहे. महाराष्ट्रातील एकमेव पोटनिवडणूक अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात होणार आहे. २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यासोबतच पोटनिवडणुकीची देखील प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमासोबतच देशभरातील २६ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम देखील प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिमची जागा रिक्त झाली होती. राज्यात विधानसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षाही कमी कालावधी असल्याने पोटनिवडणूक होणार की नाही, असा संभ्रम असताना प्रशासनाने पोटनिवडणुकीची तयारी केली.

हेही वाचा…रामटेकसाठी भाजपला का हवे काँग्रेस आमदाराच्या हातात कमळ

गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ ला निधन झाल्याने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. लोकसभा अथवा विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्षापेक्षा अधिक कालावधी असल्यास पोटनिवडणूक कायद्याने बंधनकारक आहे. २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक झाली होती. आता २६ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभेचा कालावधी संपुष्टात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी एक वर्षांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला. एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना जागा रिक्त झाल्यास पोटनिवडणूक टाळता येते, ही लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतूद अकोला पश्चिम मतदारसंघासाठी लागू पडत असल्याने येथे पोटनिवडणूक होणार की नाही, ही संभ्रमावस्था होती. दरम्यान, निवडणूक आयोगासह प्रशासनाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली होती. आज लोकसभेच्या सार्वत्रिक कार्यक्रमासोबतच विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा…“आमदार सुभाष धोटेंचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने,” देवराव भोंगळे यांचा पलटवार; म्हणाले….

गड राखण्याचे भाजपपुढे आव्हान

गत तीन दशकांमध्ये अकोला आणि गोवर्धन शर्मा असे समीकरण तयार झाले. विधानसभेवर विजयाची ‘डबल हॅट्‌ट्रिक’ साधून शर्मा यांनी इतिहास रचला होता. तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व व दबदबा त्यांनी निर्माण केला होता. सलग सहा निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणणाऱ्या गोवर्धन शर्मा यांना २०१९ मध्ये काँग्रेसने कडवी झुंज दिली होती. त्यानंतर गेल्या चार वर्षांत आ.गोवर्धन शर्मांनी जनाधार मजबूत करण्यावर भर दिला. आता त्यांच्या निधनानंतर गड कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान असेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola west assembly constituency to hold by election alongside lok sabha general election voting on 26 april 2024 ppd 88 psg