नागपूर : विधानसभा निवडणुकीत कायदेशीर प्रक्रियेचे पालन न झाल्याचा तसेच ईव्हीएमच्या माध्यमातून घोळ केला असल्याचा दावा करणाऱ्या आठ निव़डणुक याचिका शनिवारी दाखल झाल्या होत्या. यात जवळपास सर्वच याचिकाकर्ते महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पराभूत उमेदवार आहेत. सोमवारी महाविकास आघाडीच्या आणखी पाच उमेदवारांनी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला. नव्या याचिका प्रक्रियेचे पालन करून मंगळवारी दाखल होण्याची शक्यता आहे. निवडणूक याचिकांच्या या पावसात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पराभूत भाजप उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका आहे. भाजपचे अग्रवाल यांनी निवडणूक घोळ झाल्याचा आरोप करत कॉँग्रेसचे विजयी उमेदवार साजीद खान पठाण यांच्या विजयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. मतदान केंद्रावर डबल व्होटींग झाल्यामुळे कॉग्रेसचे साजिद खान निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची निवडणूक रदद करावी, अशी मागणी विजय अग्रवाल यांनी याचिकेत केली. याशिवाय कॉँग्रेसचे विजय वड्डेटीवार यांच्या विरोधात ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नारायण जांभुळे यांनी याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा : नागपूर : सावधान! शासकीय नोकरीचे बनावट नियुक्तीपत्रे; टोळ्या सक्रिय…
या उमेदवारांना निवडणुकीवर शंका
काटोल विधानसभा मतदारसंघातून लढलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) उमेदवार सलील देशमुख यांनी भाजपचे चरण ठाकूर यांच्या विजयाला आव्हान देतील. याखेरीज हिंगणा मतदारसंघातील रमेशचंद्र बंग, अकोला जिल्ह्यातील आकोट मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ॲड. महेश गणगणे, तुमसर येथील राष्ट्रवादी पक्षाचे (शप) चरण वाघमारे आणि बुलढाणा मतदारसंघातील शिवसेनेच्या (उबाठा) ॲड. जयश्री शेळके या सुद्धा याच प्रकारच्या याचिका दाखल करणार आहेत. सोमवारी या उमेदवारांनी न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्याचे प्रयत्न केले, मात्र न्यायालयाकडून त्यांची याचिका दाखल झाली नाही. आज, मंगळवारी ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरुद्ध नागपूर दक्षिण पश्चिममधून निवडणूक लढविलेले काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव, अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील उमेदवार; तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सुभाष धोटे, शेखर शेंडे, संतोषसिंग रावत, सतीश वारजूरकर यांनी शनिवारी निवडणूक याचिका याचिका दाखल केल्या होत्या. याचिकांनुसार, ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी ज्या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता करावी लागते ती निवडणूक आयोगाने केली नाही. ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीतील निकषांचेही पालन झालेले नाही. निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांनी मागणी केल्यानंतरही सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर-१७ देण्यात आले नाही, असे अनेक दावे याचिकेत करण्यात आले आहेत.