अकोला : ‘मॉर्निंग वॉक’ साठी घरातून बाहेर पडलेल्या एका महिलेचा गळा आवळत रस्त्यावर डोके आपटून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शहरातील जुना हिंगणा मार्गावर घडली. शेजारच्या सोबत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जुना हिंगणा मार्गावर आज सकाळी सविता विजय ताथोड (४६) आपल्या मैत्रिणीसोबत ‘मॉर्निंग वॉक’साठी गेल्या होत्या. यावेळी आरोपी धीरज चुंगडे याने पूर्ववैमनस्यातून सविता ताथोड यांचा घरापासून काही अंतरावरच रस्ता अडवला. आरोपीने महिलेचा गळा आवळला. त्यांना खाली पाडून रस्त्यावर डोके आपटले. दुसऱ्या एका महिलेने व परिसरातील पुरुषाने सविता ताथोड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. आरोपीने सविता ताथोड यांना गंभीर जखमी केल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच जुने शहर व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला देखील घटनास्थळावर पाचारण केले. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा…“तुमच्या घरातून चोरी झालेले दागिने सापडले…” पोलिसांनी ३ कोटींचा मुद्देमाल…
दोन महिन्यांपूर्वी झाला होता वाद
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी सविता ताथोड व आरोपीच्या कुटुंबामध्ये वाद झाला होता. या वादातून मारहाण देखील झाली होती. त्यावरून परस्पर विरोधी तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. या किरकोळ वादाचा राग आरोपीच्या मनात कायम होता. त्या वादातूनच आरोपीने आज महिलेवर गंभीर हल्ला करून हत्या केली. या घटनेमुळे ताथोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा…सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या प्रतिमा पूजनावरून वाद! राज्य शासनाच्या ‘या’ निर्णयाला विरोध…
शहरात खळबळ
‘मॉर्निंग वॉक’साठी गेलेल्या महिलेची भररस्त्यात निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान अकोला पोलिसांपुढे राहील. दोन महिन्यांपूर्वीचा किरकोळ वाद विकोपाला गेला आणि महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.