जिल्ह्यातील उगवा येथील दोन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी दोन-तीन चित्रफित प्रसारित झाल्याने त्या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले.

अकोट फैल पोलिसांनी गुटख्याचे प्रकरण दाबण्यासाठी एक लाखाची लाच घेतल्याचा आरोप करून त्यांच्या दबावातून आत्महत्या करीत असल्याचे मृत्यूपूर्वी युवकाने केलेल्या चित्रफितीत म्हटले आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी सुरू केली असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना शनिवारी ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांशी संलग्न केले आहे.

उगवा येथील सुभाष शेषराव भातकुले (३६) व आशिष गोपीचंद अडचुले (३५) या दोघांनी सततच्या नापिकीला कंटाळून मंगळवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर काही दिवसांनी अडचुले यांच्या दोन ते तीन चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाल्या. त्यामध्ये त्यांनी अकोट फैल पोलिसांवर आरोप केले आहेत. २०२१ मध्ये पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी कारवाई केली होती. पोलिसांनी कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपये घेतले व त्यानंतरही कारवाई केली. या चित्रफितीत एका ‘पीएसआय’सह सात ते आठ पोलिसांची नावे घेण्यात आली आहे. यात त्यांनी काही खासगी व्यक्तींची नावे देखील घेतली आहेत. पोलिसांच्या दबावातून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्यामार्फत चौकशी सुरू केली आहे. निष्पक्ष चौकशी होण्यासाठी संबंधित पोलिसांना शहर वगळता ग्रामीण भागातील पोलीस ठाण्याशी संलग्न केले आहे. दोन ते तीन दिवसांत चौकशी अहवाल सादर झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिली.

दरम्यान, आत्महत्या केलेल्या व्यक्तीने चित्रफितीमध्ये न्यायाधीशासह पोलीस व नागरिकांना देखील शिवीगाळ केली आहे. तो व्यसनाधिन होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.