अकोला : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्यावतीने घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट व सीए अंतिम परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतील देशपातळीवरील गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली. सीए इंटरमिजिएट परीक्षेमध्ये अकोल्यातील युग कारिया याने संपूर्ण देशातून दुसरे स्थान पटकावले. देशातील पहिल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये अकोल्यातील एकूण चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सीए इंटरमिजिएट परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या यशामुळे अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.

‘आयसीएआय’च्यावतीने सीए इंटरमिजिएट व सीए अंतिम परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षांचा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘आयसीएआय’ने या परीक्षेतील ‘टॉपर्स’ची नावेही जाहीर केली. सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल १८.४२ टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये अकोल्यातील युग सचिन कारिया संपूर्ण देशातून दुसरा आला आहे. त्याला ५२६ गुण मिळाले. त्याची टक्केवारी ८७.६७ आहे. अकोल्याच्या इतिहासात प्रथमच सीए इंटरमिजिएट परीक्षेत चार विद्यार्थी देशपातळीवर गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यामध्ये युग सचिन कारिया दुसऱ्या स्थानी, यश शैलेंद्र पाटील देशपातळीवर ४५ व्या क्रमांकावर, यश मनोज देशमुख ४७ व्या, तर पीयूष प्रवीणसिंग मोहता याने ४८ वे स्थान पटकावले आहे. या चारही विद्यार्थ्यांनी सीए इंटरमिजिएट परीक्षेची तयारी अकोल्यात राहूनच केली. सीए परीक्षेच्या टॉपर विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व दिसून येते. मात्र, यावेळेस प्रथमच एकाच वेळी अकोल्यातील चार विद्यार्थी देशपातळीवर पहिल्या ५० मध्ये स्थान प्राप्त केले आहे. सीए परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

हेही वाचा >>>भंडारा : अनोखे आंदोलन; मोर्चात चक्क म्हशी…

दरम्यान, सीए इंटरमिजिएट परीक्षेमध्ये देशपातळीवर दुसरे स्थान पटकावणारा युग सचित कारिया हा लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी आहे. त्याला अभ्यासाची खूप आवड आहे. दहावी, बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यावर सीए होण्याची महत्त्वाकांक्षा युगने उराशी बाळगली. त्या दृष्टीने त्याने जोमाने तयारी सुरू करून अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. सीए फाउंडेशनच्या परीक्षेमध्ये देखील युगने चांगले गुण मिळवले होते. युगचे वडील व्यावसायिक आहेत. युगच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.