|| मंगेश राऊत
वाईन शॉप मालकांवर पोलिसांचा आशीर्वाद
वर्धा, गडचिरोलीनंतर चंद्रपूर जिल्ह्य़ात दारूबंदी लागू झाली. या दारूबंदीने नागपूरच्या दारूविक्रेत्यांचे फावले असून चंद्रपूर व वर्धेला नागपुरातून मोठय़ा प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याचे अनेकदा झालेल्या कारवायांमधून उघड झाले आहे. अशाच दारू तस्कराने नागभीडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा जीव घेतल्यानंतर पुन्हा एकदा उपराजधानीतून होणाऱ्या दारू तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला.
चंद्रपूर जिल्ह्य़ात दारूबंदीची मागणी होती. त्यासाठी आंदोलन झाल्यावर सरकारने वर्धा आणि गडचिरोलीनंतर चंद्रपूर जिल्ह्य़ात दारूबंदी करण्याचा निर्णय २१ जानेवारी २०१५ ला घेतला. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात आली. मात्र, त्यानंतर छुप्या पद्धतीने दारूविक्री सुरू झाली. चंद्रपुरात नागपूरमार्गे अवैध दारू नेली जाऊ लागली. दारूबंदीमुळे नागपूरच्या दारूविक्रेत्यांचे फावले आहे. अडवानी, जयस्वाल यांच्या वाईन शॉपमधून ही दारूची तस्करी होत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दारू तस्करीला पोलीस दलातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत आहे. याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यांना असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. नागपूर पोलिसांनीच दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या तर नागभीडमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टळेल, अशी प्रतिक्रिया नागपूरकर व्यक्त करीत आहेत.