यवतमाळ : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ झालेल्या खाजगी बसच्या अपघातात काही प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी परिवहन विभागाच्यावतीने विशेष काळजी घेतली जात आहे. त्यानुसार विभागाच्यावतीने लांब पल्ल्याच्या बस चालकांची मद्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ५२ चालकांची तपासणी करण्यात आली असून ही तपासणी यापुढे नियमितपणे सुरु राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी समृध्दी महामार्गावर सिंदखेड राजा जवळ खाजगी बसचा अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने काही प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिवहन विभाग सुरक्षेच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करत आहे. त्या अनुषंगानेच खाजगी बस विशेषतः स्लिपर कोच बस चालकांची मद्य तपासणी केली जात आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : भर पावसात भात रोवणीसाठी जिल्हाधिकारी शेतात

यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून ही तपासणी केली जात आहे. यवतमाळ येथून मुंबई, पुणे किंवा अन्य लांब ठिकाणी जाणाऱ्या बसचालकांची ही तपासणी केली जात आहे. अन्य ठिकाणाहून येणाऱ्या आणि यवतमाळ येथून प्रवासी घेणाऱ्या किंवा उतरविणाऱ्या बस चालकांची देखील मद्य तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> ‘तो’ मध्यरात्री अडाणच्या पुरात अडकला पण…, पाच तास चालली बचाव मोहीम

या तपासणीमध्ये विशेषतः खाजगी व स्लिपरकोच बस चालकांवर भर देण्यात आला आहे. बस चालकांना थांबवून ब्रीथ अँनालायझरद्वारे परिवहन विभागाचे अधिकारी ही तपासणी करतात. आतापर्यंत ५२ बस चालकांची तपासणी करण्यात आली आहे. यापुढेही सदर तपासणी मोहिम नियमितपणे सुरु राहणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी.ई.हिरडे यांनी सांगितले.

कारवाईचा इशारा

बस चालक आपल्यासोबत अनेक प्रवाशांना घेऊन जात असतो. प्रवाशी देखील चालकाच्या विश्वासावर बसने प्रवास करतात. त्यामुळे चालकाची देखील प्रवाशांना सुरक्षितपणे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. चालकांनी या जबाबदारीचे पालन करावे. बस चालवितांना सुरक्षितपणे चालवावी आणि कोणत्याही प्रकारचे मद्य प्राशन करु नये. मद्य प्राशन केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alcohol testing of long distance bus drivers by department of transport nrp 78 ysh
Show comments