बुलढाणा : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील संग्रामपूर तालुका एका दुर्दैवी क्रूर घटनेने हादरला! दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईला क्षुल्लक कारणावरून पेटवून दिले. यामुळे दुर्देवी माता गंभीररित्या भाजली असून मृत्युशी झुंज देत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे रविवारी संध्याकाळी घडलेल्या या भीषण घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. गंभीररित्या भाजलेल्या मातेवर शेगाव येथील सई बाई मोटे शासकीय उप जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. गौरव अरुण देशमुख असे आरोपी पुत्राचे नाव आहे. गौरव संध्याकाळी पातुर्डा येथील आपल्या घरी आला. यावेळी तो दारू प्यालेला होता. त्याचे आईसोबत ( मीना देशमुख) साडी परत मागण्यांवरून भांडण झाले. साडी दिली नाही तर तुला आग लावुन पेटवून देण्याची धमकी आईला दिली.
यावर बिचाऱ्या आईने त्याची समजूत घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र दारूच्या नशेत असल्याने काही एक न ऐकता साडी काढून देण्याचा तगादा लावला. यामुळे मीना देशमुख गयावया करीत असतानाच आरोपी गौरव याने आईच्या कपड्यांना आग लावून पेटवून दिले.जिवाच्या आकांताने महिला आरडा ओरड करत असल्याने गावकरी धावून आले. माहिती कळतच तामगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिकाद्वारे महिलेला शेगाव येथील शासकीय रूग्णालयात हलविले.
वडील अरुण देशमुख यांनी तामगाव पोलीसात फिर्याद दिली. त्यामध्ये मुलगा गौरव दारु पिऊन नेहमी मला व माझ्या पत्नीला शिवीगाळ करतो व जिवाने मारण्याची धमकी देत असल्याचे नमूद केले. पोलीसांनी आरोपी गौरव अरूण देशमुख विरूद्ध गुन्हा दाखल केला.