वर्धा : वर्धेतील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत गेली पाच दिवस साहित्य रसिक आणि सारस्वतांच्या मेळा भरला होता. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य नगरी सजली आणि गजबजली होती. संमेलनात दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रम पार पडले. अशा स्थितीत स्वच्छतेचा प्रश्न उद्भवणारच. पण, एका दिवसाचे कार्यक्रम आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी संमेलन परिसर परत चकाचक व लख्ख दिसायचा, हे करतोय कोण, तर त्याचे उत्तर पुढे आले आहे.

हेही वाचा >>>सावित्रीच्या लेकीची परदेशात दखल; गडचिरोलीच्या ‘टॅक्सी’चालक तरुणीला इंग्लंडच्या विद्यापीठात प्रवेश

दोन, तीन व चार फेब्रुवारीस सकाळी साहित्य नगरीत पोहचणाऱ्या रसिकांना परिसर पूर्ववत स्वच्छ दिसायचा. दिवसभर शेकडोंचा वावर राहणाऱ्या या जागेवर कोण झाडू मारतोय, हे गुपितच. वाटायचे की, पालिकेचे स्वच्छता दूत हे कार्य जबाबदारीने करीत असतील. मात्र ते शहर स्वच्छतेत असायचे. संमेलन परिसर रोज साफ करण्याचं काम रात्री अकरा ते बारा दरम्यान चालायचं. संमेलनाचे पदाधिकारी असलेले येथील नामवंत उद्योजक आसिफ जाहिद व त्यांची पंधरा सहकाऱ्यांची चमू सगळे आटोपले की सफाईच्या कामास लागायची. त्यांच्या मदतीस चाळीस कर्मचारी असायचे. सर्व स्वच्छ झाले की ते घरी परत जायचे. संमेलन स्थळाची स्वच्छता चर्चेत होती. त्याचे गुपित सांगताना आसिफ जाहिद म्हणतात की, कार्यक्रमाच्या दिवशी केरकचरा दिसणे योग्य नव्हे, या भावनेने हे कार्य तीन दिवस चालले. रविवारी समारोप झाल्यावर सर्वांनी विश्रांती घेतली. मंडप व अन्य साहित्य उचलल्यानंतर सर्व पदाधिकारी हा वीस एकरचा परिसर स्वच्छ करून देऊ. आसिफ जाहिद व त्यांच्या सहकाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच म्हणावे लागेल.

Story img Loader