नागपूर / छत्रपती संभाजीनगर : विदर्भातील नागपूरसह सर्व जिल्ह्यांना मंगळवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे बागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.मंगळवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाने जोर धरला.शहरात अनेक ठिकाणी गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळसह बाभूळगाव, आर्णी, उमरखेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. बाभूळगाव तालुक्यात अनेक गावांत अनेक घरांवरची छप्परे उडाली. वीजवाहिन्यांच्या तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अमरावती जिल्ह्याच्या काही भागांत गारपिटीसह पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचे नुकसान झाले. वाशीम जिल्ह्यात इंझोरी येथील सौरचक्की संच उन्मळून पडले. मानोरा तालुक्यातील चिखली येथे लग्नाचा मंडप उडाला. चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे मुख्य चौकातील पुरातन गरुड स्तंभाचा कळस कोसळला. विदर्भाला आणखी काही दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मराठवाडय़ात हिंगोली जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, डिग्रस बुद्रक, सालापूर, सुकळी, गुंडलवाडी, दांडेगाव, रेडगाव, वडगाव, जवळा या भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने केळीची झाडे घडासकट उन्मळून पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी १ ते ४ या वेळेत पाऊस आणि गारपीट झाली. नांदेडसह भोकर, हिमायतनगर, लोहा, नायगाव या तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे भुईमूग, हळद, ऊस, केळीसह आंबा, पपई, डाळिंब, मोसंबी, संत्रा, चिकू यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज पडल्याने काही जनावरेही दगावली आहेत. नांदेड शहराच्या सखल भागात पाणी साचले होते.