नागपूर : अवघा बांगलादेश सध्या होरपळत आहे. अशा संकटाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तेथील हिंदूंची चिंता अस्वस्थ करीत आहे. हिंदू सुरक्षित असले पाहिजे, यासाठी संघाने तातडीने पावले उचलली असून केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहे. केंद्र सरकार याची दखल घेईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आणि माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केला.
देवता फाऊंडेशनच्या एक रुपया दान, कॅन्सरमुक्त अभियान या कार्यक्रमानंतर ते मंगळवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. रामनगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बांगलादेश हा एक वेगळा देश आहे. आम्ही सरकारला निवेदन करतो की तेथे हिंदू सुरक्षित राहतील, याची काळजी घ्या. बांगलादेशमध्ये आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती लवकर निस्तारेल असे वाटत नाही. मात्र बांगलादेश मधील हिंदू सुरक्षित असला पाहिजे, असे निवेदन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सरकारल दिल्याचे भैय्याजी जोशी यांनी स्पष्ट केले. तसेच सरकार यासाठी योग्य पावले उचलेल असाही विश्वास व्यक्त केला. बांगलादेशमध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात आहे, मंदिर तोडले जात असल्यामुळे तेथील हिंदू असुरक्षित आहे का, असे विचारले असता भैय्याजी जोशी म्हणाले, अशा बातम्या आम्ही सुद्धा ऐकत आहोत. मात्र आम्ही सरकारला विनंती केली आहे. नक्कीच सरकार योग्य पावले उचललेल, असा विश्वास भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>>‘‘राज्यपाल करा, अन्यथा न्यायालयात जातो,” आनंदराव अडसुळ यांचा इशारा, नवनीत राणांच्या अडचणी…
देवता फाऊंडेशन यांच्या वतीने सुरू असलेल्या उपक्रमाचे भैय्याजी जोशी यांनी कौतुक केले. हा उपक्रम भरभराटीत जावो, असे म्हणता येणार नाही.कारण तसे म्हणणे म्हणजे कॅन्सर रुग्ण वाढवणे असा होईल. मात्र कॅन्सर मुक्त होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. समाज कॅन्सरमुक्त व्हावा यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. देवता फाऊंडेशनने ३२ कॅन्सरग्रस्त मुलांना दत्तक घेतले. गेल्या काही वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. फाऊंडेशनने चांगला उपक्रम सुरू केला आहे. कॅन्सरवर उपचारासाठी मोठा खर्च येतो आणि सामान्य नागरिकांना हा खर्च करणे शक्य नाही. देवता फाऊंडेशनने हा उपक्रम सुरू केल्यानंतर मुलांचा महिन्याकाठी होणाऱ्या खर्चाला समाजाने हातभार लावल्यास संस्थेला मदत होईल. त्यामुळे या प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.