भंडारा : येत्या सोमवारी प्रचारतोफा थंडावणार आहेत. विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांचा प्रचार त्यांचे कार्यकर्ते जोमात करीत आहेत. आजच्या घडीला घरोघरी जाऊन प्रचार होत आहे. यंदा साकोली विधानसभा क्षेत्राची निवडणूक रोमांचक आहे.

अशातच महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार नाना पटोले हे पुन्हा निवडणूक रिंगणात उभे आहेत. नुकतेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदने पत्रक रूपात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यात “गोड बोलून आदिवासी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नाना पटोले यांना मतदान करू नका”, असे आवर्जून सांगितले आहे.

हेही वाचा…गडकरींकडून महाराष्ट्र पालथा

गेल्या वीस- पंचवीस वर्षापासून जनतेचे प्रतिनिधी असलेल्या नानाभाऊनी क्षेत्राचा कमी परंतु स्वतःचा जास्त विकास केला आहे. क्षेत्रातील जनता नानाभाऊच्या कामापासून खुश नाही. त्यांना नवीन पर्याय हवा आहे. नाना पटोले यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत आदिवासी जंगल कामगार अध्यक्षपदी गैरआदिवासी असलेल्या ढिवर समाजाच्या व्यक्ती सदाशिव वलथरे यांची नियुक्ती केली आहे. हा आदिवासी समाजावरती अन्याय आहे.

हेही वाचा…चंद्रपुरात कॉंग्रेस उमेदवाराची स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून कोंडी? जिल्ह्यातील इतर जागांवर परिणाम होण्याची शक्यता

याचे भान ठेवून नाना पटोले यांना डावलून आदिवासी समाजाचे हित साधणाऱ्या उमेदवारालाच निवडून द्या, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लाखनी तालुका अध्यक्ष शेषराव पंधरे यांनी केले आहे. दरम्यान, उपाध्यक्ष सूर्यभान मडकाम, संजय पेंदाम, झाशीराम मडावी, संदीप पंधरे, राजू पंधरे, मुरलीधर मरस्कोल्हे, उत्तम वाढीवा यांनी देखील पाठिंबा दर्शिवीला आहे.