लोकांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी लोकजागृती करणे, जनप्रतिनिधींना त्याबाबत जाब विचारण्याची इच्छाशक्ती, सामथ्र्य व क्षमता लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी विदर्भ विकास आघाडीची आवश्यकता आहे, असे मत महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले.
‘विदर्भाच्या विकासात रेल्वेची भूमिका’ या विषयावर सर्वपक्षीय चर्चासत्र पत्रकार भवनात आयोजित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. रेल्वे-लोकलची विदर्भातील भूमिका ही नागरी व ग्रामीण परिसर यांना जोडणाऱ्या सर्वाधिक महत्त्वाच्या दुव्याची राहणार आहे. केवळ मूठभर शहरे चकचकीत व गुळगुळीत करणाऱ्या प्रचंड गुंतवणुकीच्या उद्योगांची रंगीत स्वप्ने दाखवण्याने लोकांना हवा असलेला विकास होणार नाही. यातून रोजगार निर्मितीची खोटी आश्वासने पदरात पडतील. आंदोलने करणाऱ्यांना राष्ट्राचे शस्त्रू ठरवले जात आहे, तर विकासातून मूठभरांची सत्ता, वर्चस्व आणि संपत्ती यात अमर्याद वाढ केली जात आहे. ही कामे करणाऱ्या उद्योजकांना राष्ट्रभक्त ठरवले जात आहे. या पाश्र्वभूमीवर खोटय़ा व भ्रामक विकासाला प्रश्न विचारण्यासाठी आणि लोककेंद्री विकासाची कास धरण्यासाठी आघाडीची गरज आहे, असेही ते म्हणाले.
या विषयावरील चर्चासत्रात विदर्भवादी नेते राजकुमार तिरपुडे, राष्ट्रवादीचे नेते अतुल लोंढे, भाजप शहर उपाध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हेमंत गडकरी, आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे आणि कामगार नेते जम्मू आनंद सहभागी झाले होते. ‘मध्यभारत न्यूज नेटवर्क’च्या वतीने जनजागृती करणारे नेते मंगेश तेलंग आणि नाना ठाकरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मध्य रेल्वे आणि दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे नागपूर विभाग आणि दक्षिण-मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मिळून नागपुरात रेल्वे झोन स्थापन करण्यात यावा, नागपूर-कळमेश्वर-काटोल-नरखेड-पाढुर्णा-भंडारा-तुमसर-गोंदिया-वर्धा-पुलगाव-रामटेक-धामणगाव तसेच वरुड-बेनोडा-हिवरखेडा-मोर्शी-चांदूरबाजार, वळगाव येथील फलाटांची उंची वाढवण्यात यावी, इतवारी, अजनी-कळमना-खापरी टर्मिनल म्हणून विकसित करण्यात यावे आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या लोकल गाडय़ा सुरू करण्यात याव्यात, असे मंगेश तेलंग म्हणाले.
विकासाच्या प्रश्न जनप्रतिनिधी निवडले गेल्यास विकास वेग वाढेल, असे अतुल लोंढे म्हणाले. लोकांना मेट्रोची नव्हे लोकल गाडीची तातडीने आवश्यकता आहे, असे राजकुमार तिरपुडे म्हणाले. विकासाचे प्रारूप सर्वसमावेशक आहे की, मूठभरांच्या लाभाचे हे स्पष्ट झाल्यावर रेल्वेची विकासात भूमिका मांडता येणे शक्य आहे, असे जम्मू आनंद म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा