अकोला : वसंत ऋतुच्या प्रारंभी वसुंधरा नव्या रंगात नटत असताना आकाशातही ग्रह ताऱ्यांची विविध प्रकारच्या रंगरुपात आनंदाची उधळण होत आहे. पश्चिम आकाशात सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सप्त ग्रह-उपग्रह एक सोबत असल्याचा अनोखा नजारा दिसत आहे. उत्तर गोलार्धातील सर्व देशांना हे दृश्य पाहता येत असल्याची माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक, खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.
हेही वाचा >>> नागपूर : अमित शाह दीक्षाभूमीवर, आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन
पश्चिम क्षितिजावर सर्वात तेजस्वी ग्रह शूक्र, खालील भागात सर्वात दुरचा नेपच्यून ग्रह, जरा बाजूला चंद्रकोर, थोडा वर सर्वात मोठा असलेला गुरु ग्रह, जवळच वेस्टा लघू ग्रह, जरा वर युरेनस ग्रह व मधात लालसर रंगाचा मंगळ ग्रह दिसून येतो. पूर्व क्षितिजावर मिथुन राशी, बाजूला उजवीकडे बहु परिचित मृग नक्षत्र, त्रिकांड बाणा खाली पृथ्वीवरुन दिसणारा सर्वात तेजस्वी व्याध तारका व दक्षिण आकाशात अधिराज्य गाजवणारा रंगीबेरंगी अगस्ती ताऱ्याचे खूप मनोहारी स्वरूपात दर्शन होत आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेला गुरु ग्रह व सर्वात तेजस्वी शूक्र ग्रह हे पश्चिम क्षितिजाचे प्रमुख आकर्षण आहे. त्यामधील अंतर कमी होत २ मार्च रोजी अगदी जवळ असतील. २३ फेब्रुवारीला चतुर्थीची चंद्रकोर तिच्या खाली गुरु ग्रह व जरा खाली शूक्र ग्रह असा डोळ्यांचे पारणे फेडणारा आकाश नजारा अतिशय सुंदर व मनमोहक असेल. मीन राशीतील हा आकाशातील कुंभमेळा अनेक दिवस स्मरणात राहील. आकाशप्रेमींनी या अनोख्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वभारती केंद्राकडून करण्यात आले आहे.