महेश बोकडे
नागपूर : गणेश उत्सवात कोकण व गोवा येथे २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या भाविकांना पथकर माफीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयातून पास घ्यावा लागतो. परंतु उत्सवाला जात असल्याचे सांगून सरसकट सगळेच वाहन चालक या पथकर माफीचा लाभ मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांचा मनस्ताप वाढणार आहे.
या पथकर माफीचा लाभ नागपूरकरांनाही मिळणार असून नागपूर आरटीओने भाविकांना शहर आरटीओ कार्यालयात अर्ज करून पास घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, नागपूर आरटीओ कार्यालयात तळमजल्यावरच यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. येथे या पाससाठी कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. त्यामुळे या योजनेचा गैरफायदा उचलला जाऊ शकतो. शिवाय कालांतराने या पथकराची भरपाई शासनाला संबंधित कंत्राटदाराकडे करावी लागेल. त्यामुळे निश्चितच शासनाला त्याचा फटका बसणार आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी नागपूर शहर आणि राज्यातील इतरही काही आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांशी लोकसत्ताने संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर गैरभाविकही या पथकर माफीचा लाभ घेणे शक्य असल्याची कबुली दिली. या विषयावर परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.