मेळघाटातील कुपोषण आणि बालमृत्यूंचा प्रश्न गंभीर आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना मातांना अजूनही चांगला पोषण आहार मिळू शकत नाही, ही अतिशय कमीपणाची बाब आहे. या प्रश्नामध्ये आपण राजकारण आणणार नाही. या स्थितीला सर्वच राज्यकर्ते जबाबदार आहेत, असे स्पष्ट मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी सायंकाळी धारणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
हेही वाचा – चंद्रपूर: ‘त्या’ वाघाच्या मिशा व चार दात जप्त
विरोधी पक्षनेते पवार यांनी शनिवारी मेळघाटातील कुपोषणाचा आढावा घेतला. त्यांनी सुरूवातीला दिदंबा गावाला भेट देऊन कुपोषणग्रस्त बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कळमखार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यानंतर धारणी येथे मेळघाटात कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. पवार म्हणाले, मेळघाटातील माता आरोग्याचा प्रश्न आहे. अनेक महिलांना गरोदरपणाच्या काळात घरातील चूल पेटविण्यासाठी कामावर जावे लागते. अशावेळी त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. कमी वजनाचे मूल जन्माला येणे आणि त्यानंतर कुपोषण, बालमृत्यूच्या घटना समोर येतात. ज्या पद्धतीने शासकीय सेवेतील महिलांना तीन महिने गरोदरपणाच्या काळात आणि तीन महिने प्रसूतीपश्चात रजा मिळते, त्याच प्रमाणे गरीब आदिवासी महिलांना तीन महिने आधी आणि प्रसूतीनंतर तीन महिने नि:शुल्क आहार देण्याची व्यवस्था सरकारने करायला हवी, अशी सूचनाही त्यांनी केली. मेळघाटात कमी वयात लग्न होणे, अंधश्रद्धेतून दवाखान्यात जाणे टाळणे, पोषण आहारातील कमतरता असे अनेक प्रश्न आहेत. या भागात प्रबोधनाची गरज आहे. सरकार, स्वयंसेवी संस्था आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्व मिळून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे अजित पवार म्हणाले.
मेळघाटात कमी वयात लग्न होणे, अंधश्रद्धेतून दवाखान्यात जाणे टाळणे, पोषण आहारातील कमतरता असे अनेक प्रश्न आहेत. या भागात प्रबोधनाची गरज आहे. सरकार, स्वयंसेवी संस्था आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्व मिळून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे अजित पवार म्हणाले.
महिलांनी वाहनांचा ताफा रोखला
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मेळघाट दौऱ्यादरम्यान कळमखार येथे महिलांनी त्यांच्या वाहनांचा ताफा रोखून आपल्या व्यथा मांडल्या. अजित पवार त्यानंतर स्वत: वाहनातून खाली उतरले आणि महिलांशी संवाद साधला. गावकरी मुलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असून पावसाळ्यात नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरत असूनही काहीच उपाययोजना केली जात नसल्याचे गाऱ्हाणे महिलांनी पवारांसमोर मांडले. आपण यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असे अजित पवार यांनी सांगितले.