व्यापार, उद्योग, मॉलसह सर्वच क्षेत्रात मंदी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाचशे, हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर तेरा दिवस होऊनही स्थिती सामान्य झाली नाही. नोटा नसल्याने खरेदी बंद आहे आणि खरेदी बंदमुळे व्यापार ठप्प झाले आहेत. गरजेइतकी रोख नसल्याने कारखानदार मजुरांना त्यांची मजुरी देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचे स्थलांतर वाढले आहे. दुसरीकडे मॉल्समधील रोख खरेदी थांबली आहे, त्यामुळे तेथील उलाढाल निम्म्यावर आली आहे. सुरुवातीच्या काळातील फटका सहन करून हॉटेल व्यावसायिक यातून सावरत असले तरी त्यांच्याही व्यवसायात एकूण १५ टक्के घट नोंदविली गेली आहे. ठोक आणि किरकोळ किराणा व्यापार जवळजवळ ठप्प झाला आहे. मालाची आवक आणि विक्री कमी झाल्याने वस्तूचे भाव वधारले आहे. दुकानदार ग्राहकांची वाट पहात बसले असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे.

[jwplayer zkvFlBpu]

लघु, मध्यम उद्योजकांसमोर अडचणी

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे म्हणाले, चलन बंदीमुळे उद्योजकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक उद्योजकांच्या वेगळ्या समस्या आणि मर्यादा आहेत. स्थिती फारच वाईट आहे. अशाही स्थितीत उद्योजकांनी कसेबसे आठ दिवस काढले. अनेकांना रोख रक्कम मिळावी, अशी अपेक्षा असते, परंतु आम्ही त्यांना धनादेश देत आहोत. नोटाबंदीच्या समस्येवर उद्योजकांनी आपापल्या पद्धतीने तात्पुरता तोडगा काढला आहे, परंतु नवीन चलन नोटांचा असाच तुडवटा राहिल्यास स्थिती स्फोटक होईल. सरकार नवीन योजना आणून स्थिती सामान्य करेल, अशी अपेक्षाही पांडे यांनी व्यक्त केली.

ग्राहकांची गर्दी रोडावली

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर पहिले चार दिवस ग्राहक मॉल्सकडे भटकले नाहीत. पाचव्या दिवशी थोडय़ाफार प्रमाणात ग्राहक मॉल्सकडे वळू लागले. डेबिट किंवा क्रेडिट कार्डने व्यवहार होत आहेत. गेल्या आठवडय़ात दिवसभर डेबिट/ क्रेडिट कार्डने व्यवहार सुरळीत सुरू राहायचे, पण सायंकाळी ‘सव्‍‌र्हर डाऊन’ होण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे अनेक ग्राहकांना सामान न घेता घरी परतावे लागत होते. दोन दिवसांपासून ही स्थिती निवळली आहे, असे एका मॉलचे व्यवस्थापक म्हणाले.

बाजार समितीला फटका

नोटा रद्द झाल्यापासून बाजार समितीमधील खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदल्यात देण्यासाठी व्यापाऱ्यांजवळ पुरेसा पसा नाही. बँकेमधून अद्यापही पुरेसा पसा मिळत नाही. बहुतांश एटीएम बंदच आहेत. घरचा प्रपंच चालवण्यासाठीही आता पसे नसल्याने व जुन्या नोटा व्यवहारात कोणीही स्वीकारत नसल्याने शेतकरीवर्गाची दोन्हीकडून कोंडी झाली आहे. १० वषार्ंनंतर प्रथमच यावर्षी चांगाा पाऊस झाला. त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीन ही पिके समाधानकारक झाली. कापसाचे पीकही चांगले आले. खरीप हंगामातील ही पिके नगदी पिके म्हणून ओळखली जातात. या पिकातून मिळणाऱ्या पशातूनच शेतकऱ्यांचा वर्षांच्या खर्चाचा डोलारा सांभाळला जातो. त्याचप्रमाणे एका आठवडय़ात केवळ २४ हजार रुपये एका खातेदाराला देण्याचा निर्णय घेतला. तेवढी रक्कम बाजार समितीत व्यवहार करण्यासाठी पुरेशी नसल्याने व्यापाऱ्यांनी अजूनही खरेदी-विक्रीचे व्यवहार बंदच ठेवले आहेत. खरीप पिकानंतर आता रब्बी हंगामाची वेळ आली आहे. त्यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके घेण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पसा नाही. त्यातच शेतात रब्बी हंगामाची तयारी करण्याचे सोडून शेतकऱ्यांना दिवसभर बँकेत राहावे लागत आहे.

रोजंदारी कामगारांना सर्वाधिक फटका

शहरातील बुटीबोरी, हिंगणा एमआयडीमधील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या रोजंदारी, कंत्राटी कामगारांना चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बाद होण्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. ठेकेदारांकडे कामगारांना देण्यासाठी रोख रक्कम उपलब्ध नसल्याने कामागारांना आठ दिवसांची सक्तीची सुटी दिली आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. लघु आणि मध्यम उद्योजकांकडे रोख रक्कम नसल्याने धनादेश आणि उधारीवर कामे सुरू आहेत. या उद्योजकांना नोटाबंदीमुळे अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यांचे रोखीने होणारे व्यवहार बंद झाले असून उधारीवर कामे सुरू आहेत. सरकार उद्योजकांना दिलासा देणारा काही तरी मार्ग काढेल, अशी अपेक्षा उद्योजकांची आहे.

मॉल चालकांना कोटय़वधीचे नुकसान

शॉपिंग मॉल्समध्ये ८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांची संख्या मोठय़ा प्रमाणात रोडावली आणि कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. शहरातील बहुतांश मॉल्स शनिवार, रविवारी फुल्ल असतात, परंतु गेल्या दोन आठवडय़ात ग्राहकांनी पाठ फिरवल्याने ‘विक एन्ड’ला मॉल्समध्ये होणारी गर्दी निम्म्यावर आली. जे ग्राहक मॉल्समध्ये येत आहेत, त्यातील बहुतांश ग्राहक दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक मंदी असल्याप्रमाणे स्थिती निर्माण झाली असून आर्थिक उलाढाल मंदावली आहे.

व्यापाऱ्यांची अडचण

दहा दिवसांपासून किराणा आणि इतर व्यापार ठप्प झाला आहे. ठोक विक्रेत्यांकडून माल घेण्यासाठी चिल्लर विक्रेत्यांकडे शंभरच्या नोटा नसल्याने ते माल घेऊ शकत नाही. शेतकरी पैसे दिल्याशिवाय माल देण्यास तयार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण झाली आहे. जवळपास ८५ टक्के बाजारपेठा ठप्प झाल्या आहे.

– दीपेन अग्रवाल

माजी अध्यक्ष नागपूर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स

 

बँकेच्या माध्यमातून व्यवहार आवश्यक

व्यापार क्षेत्रात नोटाबंदीचा परिणाम झाला असला तरी परिस्थितीत बरीच सुधारणा होत आहे. व्यापार क्षेत्रात नगदी व्यवहार होतात. आता बँकेच्या माध्यमातून व्यवहार होणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांना या नोटाबंदीचा फटका बसला असला तरी येत्या काही दिवसात ही परिस्थिती सुधारेल.

– देवेंद्र पारिख, अध्यक्ष वेद

आवक घटली

बाजारात आवक जावक कमी झाली आहे. चिल्लर विक्रेत्यांकडे येणारे ग्राहक दोन हजाराच्या नोटा घेऊन येतात. त्यांना चिल्लर देण्याची समस्या आहे. त्यामुळे उधारीवर माल द्यावा लागतो. अशीच परिस्थिती राहिली तर माल आणावा कसा, असा प्रश्न निर्माण होईल.

– रवि लखानी, चिल्लर विक्रेता संघ

रोखीची अडचण

शेतकऱ्यांना पैसा दिला की ते माल देत असतात. त्यामुळे त्यांना देण्यासाठी पैसा नाही. बँकेत पैसा जमा केला असला तरी ४ हजाराच्यावर पैसा मिळत नाही. म्हणून कामगारांना पैसा देऊ शकत नसल्याने कामगार काम सोडून गावी गेले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण झाली आहे.

– चंदन गोस्वामी

किराणा व्यापारी, इतवारी ६० टक्के व्यापार घटला

नोटांसंदर्भात निर्णय जरी चांगला असला तरी मात्र सरकारने यासंदर्भात गृहअभ्यास कमी केल्याचे स्पष्ट जाणवत आहे अन् त्याचा परिणाम म्हणून आज बाजारात मंदी आहे. आज शहरातील सर्वच व्यापार साठ टक्क्यांनी थंडावला आहे. ग्राहक दोन हजाराच्या नोटांमुळे आणि शंभरच्या नोटांअभावी अडचणीत आला आहे. त्याचा थेट परिणाम व्यापाऱ्यांवर होत आहे. व्यापार क्षेत्रात रोखीचे सर्व व्यवहार थांबले आहेत. नियोजनात सरकारी यंत्रणा कोलमडली असून या मंदीचा मोठा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.

– बी.सी. भरतिया

अध्यक्ष, कॉन्फीड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स

[jwplayer 1yLms27W]