अकोला : सूर्यमालेतील सर्व सातही ग्रह आयनिक वृत्तावरील बारापैकी पाच राशीत आले. कर्क ते मकर या सातही राशी खाली आहेत. आता बटुग्रहात समावेश झालेला प्लूटो सुद्धा यात सहभागी आहे. ही अपूर्व अनुभूती आपल्या मनातील गैरसमजुती आणि भीती दूर करण्यासाठी सहायक ठरेल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.

सद्यस्थितीत वसंत ऋतूच्या स्वागतासाठी वसुंधरा विविध वनस्पतींच्या पालवी, फुला-फळांनी बहरत आहे. निसर्ग उत्सवाच्या वेळी आकाशही ग्रह ताऱ्यांच्या माध्यमातून त्यात सहभागी होत असल्याचे दिसून येते. वसंताच्या आगमन प्रसंगी आकाशात पूर्वेला मृग नक्षत्र, व्याध तारका, दक्षिणेला विविध रंगांचा अगस्त्य, पश्चिमेस शुक्र ग्रह आणि उत्तरेला शर्मिष्ठा, सप्तर्षीचे मध्यभागी ध्रुव तारा, सोबत पूर्व ते पश्चिम एकसाथ सज्ज असलेली ग्रहांची पंगत सायंकाळच्या गारव्याच्या संगतीत वातावरणात नवी रंगत भरत आहे. निरभ्र आकाशात पश्चिमेस अतिशय तेजस्वी दिसणारा शुक्र ग्रह मीन राशीत १५ अंशावर, जरा खाली सुंदर व वलयांकित असलेला शनी ग्रह कुंभ राशीत २५ अंशावर आणि येत्या २१ फेब्रुवारीपासून सर्वात लहान आकाराच्या बुध ग्रहाचा पश्चिमेस उदय होताना कुंभ राशीत २० अंशावर राहणार आहे. दि.२४ फेब्रुवारीला सायंकाळी शनी आणि बुध ग्रह युती स्वरूपात अगदी जवळ येतील. याच वेळी आकाश मध्याशी सूर्यमालेतील सर्वात मोठा गुरु ग्रह वृषभ राशीत १७ अंशावर, तर पूर्व आकाशात लालसर रंगाचा मंगळ ग्रह मिथुन राशीत २२ अंशावर दिसणार आहे, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

पश्चिम आकाशात बुधाचा उदय, शनी ग्रहाचा अस्त; आकर्षक व सुंदर नजारा

सुर्याचे लाडकं बाळ असलेला बुध ग्रह २१ पासून सूर्यास्तानंतर पश्चिमेस दर्शनार्थ सज्ज असून २७ फेब्रुवारीपासून शनी ग्रह सूर्य सान्निध्यात आल्याने अस्त होईल. २१ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ही दुर्मीळ खगोलीय घटना एक तर सायंकाळच्या वेळी आणि आकाशात चंद्र नसतांना घडून येत असल्याने याचा नजारा अधिक अंधार असलेल्या भागातूर अधिक आकर्षक व सुंदर दिसेल. आणखी एक विशेष म्हणजे शुक्र, मंगळ आणि गुरु ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्याने अधिक प्रकाशमान दिसत आहेत. खगोलप्रेमींनी या घटनांचा आनंद घेण्याचे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे. 

Story img Loader