नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या संविधान प्रास्ताविक पार्कसंदर्भात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. यासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीमधून काम पूर्ण झाले असले तरी विद्यापीठाच्या अखत्यारित येणारी संरक्षण भिंत आणि महाद्वाराच्या कामास कुलगुरूंकडून प्रत्येकवेळी आडकाठी निर्माण केली जात असल्याचा आरोप समितीमधील काही सदस्यांनी केला आहे.
नागपूर विद्यापीठाच्या संविधान प्रास्ताविक पार्कचा राेज नवा वाद समोर येत आहे. समितीमधील काही सदस्यांना बाहेर काढण्याच्या प्रकरणामुळे हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. हा पार्क लोकवर्गणी आणि विद्यापीठाच्या निधीमधून उभारण्याचा निर्णय झाला होता. समितीचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, डॉ. मेश्राम, डॉ. हिरेखण आदी सदस्यांनी निधीसाठी पाठपुरावा केला. याला यश आले व सामाजिक न्याय विभागाने २ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर केला. यानंतर पार्कच्या कामाला गती मिळाली. नागपूर सुधार प्रन्यासला नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. शासनाकडून मिळालेल्या निधीमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला. तसेच प्रास्ताविका पार्कमधील इतर गोष्टी तयार करण्यात आल्या. विद्यापीठाने त्यांच्या निधीमधून संरक्षण भिंत आणि महाद्वार तयार करावा, असा निर्णय घेण्यात आला. यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यताही दिली. त्यानंतर कुलगुरू चौधरी यांनी पुन्हा बाराहाते समिती स्थापन करून कामासंदर्भात अहवाल तयार करून घेतला.
हेही वाचा – नागपूर : जाहिरात फलकांचा थकीत कर न भरल्यास कारवाई
समितीने आपला अहवाल विद्यापीठाला दिला. हा अहवाल व्यवस्थापन परिषदेमध्ये मान्यही करण्यात आला. त्यानुसार विद्यापीठाने अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद केली होती. मात्र, असे असतानाही कुलगुरूंनी या कामाचे आदेश न दिल्याने अद्यापही संरक्षण भिंत आणि महाद्वाराचे काम सुरूच झालेले नाही. कुलगुरू चौधरींनी वारंवार या कामांत आडकाठी निर्माण केल्याने काम पूर्ण झाले नाही, असा आरोप समितीच्या काही सदस्यांनी केला.
हेही वाचा – राजकीय कार्यक्रमांच्या गर्दीने नागपूरकरांसाठी एप्रिल ‘ताप’दायक
कुलगुरूंनी दिले उड्डाण पूल बांधकामाचे कारण
समितीमधील अनेक सदस्यांनी उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी कुलगुरूंची भेट घेतली. मात्र, सध्या विधि महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामामुळे सुरक्षा भिंत किंवा महाद्वार बांधता आले नाही, असे कारण कुलगुरूंकडून समिती सदस्यांना देण्यात आले. मात्र, सदस्यांनी यावर उपाय म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रास्ताविका पार्कचे काम सुरू ठेवावे, अशी परवानगी दिली. पुलामुळे काम अडणार नाही असेही सांगितले. असे असतानाही कुलगुरूंनी अद्याप काम सुरू केलेले नाही, असा आरोप समितीचे सदस्य व माजी कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी केला आहे.