नागपूर: खासदार राहुल शेवाळे कधी संसदेत बोलत नाहीत. काल बोलून बोलून त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी मुंबईतील निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले. त्यात काहीच तथ्य नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला.
विधान भावन परिसरात ते बोलत होते. मुंबईच्या निवडणुकीत बिहारी लोकांची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा विचार करून असे खोटे आरोप होताहेत. भाजपचे नेते निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी असे प्रयत्न सुरुवातीपासून करताहेत. यापूर्वी बिहारची निवडणूक असताना सुशातसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे राजकारण करण्यात आले.
गुजरात निवडणुका आल्या तेव्हा महाराष्ट्रातील प्रकल्प पळविण्यात आले. कर्नाटक निवडणुका येताच सीमावाद तापविण्यात येत आहे. तसाच प्रकार ‘एयू’ बाबत आहे. सभागृहात विरोधकांनीमुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला की बोलू दिल्या जात नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे सभागृहात येत नाहीये, असे रोहित पवार म्हणाले. मोघम बोलून विषय टाळण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.