नागपूर : परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ ऑक्टोबरला मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्याच्या पद्धतीचा प्रारंभ केला. मात्र, त्यास बारा दिवस उलटूनही बदल्यांची यादी प्रसिद्ध झाली नसल्याने ती यादी गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मोठी देवाण-घेवाण होत असल्याचे आरोप झाले होते. हा प्रकार थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदल्यांमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी बदल्यांमध्ये नवीन संगणकीकृत प्रक्रिया राबविण्याचे निश्चित केले. त्यासाठी नवीन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली होती. बदल्यांच्या संगणकीय प्रणालीचे सादरीकरण परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांपुढे केले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदलीची अंतिम यादी काढल्याचा दावा करण्यात आला. त्यात १६६ मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९१ टक्के जणांना, तर ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९७ टक्के जणांना त्यांच्या पसंती क्रमानुसार बदली दिल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्यास बारा दिवस उलटूनही अद्याप मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादीच प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे ही यादी केली कुठे, याबाबत चर्चा रंगली आहे. या बदल्यांमध्येही घोळ झाला का, असा प्रश्न या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा >>>‘मराठा आरक्षणाच्या आड येणाऱ्याच्या नरडीचा घोट घेईल; त्याला…’, आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाने खळबळ
अधिकारी म्हणतात..
‘‘ऑनलाइन मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्यांची यादी ३० ऑक्टोबरला प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. सध्या मी छत्तीसगडला आल्याने याबाबत अनभिज्ञ आहे. याबाबत अपर परिवहन आयुक्तांकडून माहिती घ्यावी’’, असे याबाबत परिवहन आयुक्त विवेक भिमनवार म्हणाले. मात्र, अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.