लोकसत्ता टीम
वर्धा : देश विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण बिंदू असलेल्या सेवाग्राम आश्रम परिसरासाठी भव्य विकास आराखडा तयार झाला. मात्र मूळ गाव सेवाग्राम हे विकासापासून वंचीतच असल्याचा आरोप सेवाग्राम वासी करतात. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर अन्कर यांनी आश्रमासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. विकास आराखड्यात आश्रम, वरूड, वर्धा शहर,पवनार इथे कामे झाली. मात्र सेवाग्राम डावलल्या गेले.
पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणी सतत झाली. ग्रामपंचायत मार्फत दहा कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला. पण पाच वर्ष लोटूनही निधी मिळाला नाही. या गावाला विकास आराखड्यात समाविष्ट करावे, अशी पण मागणी आहे. या आंदोलनास एड. असीम सरोदे व श्रेया सरोदे यांनी भेट देवून चर्चा केली. त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. शासनास दाद मागण्याचा अधिकार आपल्याला आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागता येईल, असे सरोदे म्हणाल्याचे अनकर म्हणाले.
आणखी वाचा-यवतमाळ : पैशांचा वाद; महिलेला चाकूने भोसकले
आंदोलनास सरपंच सुजाता ताकसांडे, माजी जि. प. सभापती विजय आगलावे, माजी उपसरपंच संजय गवई, शेतकरी नेते संजय काकडे, संजय देशमुख, तेलंगणा दलित मुक्ती संघटना कार्यकर्ते, सुनील कोल्हे, दीपक भोंगडे, अरुण चव्हाण, सुरेंद्र कांबळे, दिनेश गणवीर, सागर कोल्हे, विलास पाखरे, विठल दखोळे, महेंद्र नाईक आदींनी भेट देत सहानुभूती दर्शविली.