लोकसत्ता टीम
बुलढाणा: ‘गांज्याची शेती करू द्या किंवा किडनी तरी विकण्याची परवानगी द्या’, अशी मागणी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने केली आहे. या मागणीचे निवेदन या शेतकऱ्याने थेट राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
बुलढाणा तालुक्यातील पलढग (पोस्ट कोथळी) येथील गंगाधर बळीराम तायडे यांनी ही मागणी केली आहे. जेमतेम १ हेक्टर ६० आर शेत त्यांच्याकडे आहे. ज्ञानगंगा अभयारण्याला लागून शेत असल्याने वन्यप्राणी पिकांची नासाडी करतात. पिके वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस करून राखण करावी लागते. यातून वाचली तर कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, कधी गारपीट तर कधी पिकांवर रोगराई ठरलेली. यातून हाती आलेल्या पिकांना कवडीमोल भाव मिळतो, अशी व्यथा त्यांनी सांगितली. यातून लागवडी खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नाही. मग पीक कर्ज कसे फेडणार, असा त्यांनी सवाल केला.
हेही वाचा… वर्धा बाजार समिती अध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा; सहकार गटाला ‘कात्रज’चा घाट
पीक कर्ज अल्प असल्याने खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे घेऊन शेती केली. मात्र, काहीही पिकवा तोटा ठरलेला, अशी मागील चार वर्षांपासूनची स्थिती. बँक व सावकाराचे तगादे सुरूच असल्याने नेहमी अपमान सहन करावा लागतो. या दुष्टचक्रामुळे कर्जबाजारीपणात भर पडत चालली. आत्महत्येचे विचार मनात येतात, पण मन धजावत नाही, असे त्यांनी सांगितले. आत्महत्या केली तर घरच्यांना सरकार पैसे देईल, पण मी एकमेव कर्ता पुरुष असल्याने घरचे उघड्यावर पडतील. लेकरांना बाप मिळणार नाही. त्यामुळे एकतर गांज्याची शेती करू द्या अथवा किडनी विकण्याची परवानगी द्या, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाच्या प्रती कृषीमंत्री, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आमदार संजय गायकवाड यांच्याकडे केली आहे. मागणीची पूर्तता न झाल्यास २ जूनपासून मुंबई येथील मंत्रालय समोर आंदोलन करण्याचा इशारा तायडे यांनी दिला आहे.