लोकसत्ता टीम
यवतमाळ : मी अभिनयासोबत शेतीतही रमते. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मला बऱ्यापैकी माहित आहे. खरेतर शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. शेतीचा कस परत आल्यास उत्पन्नात नक्कीच फरक पडेल. मी स्वतः सेंद्रिय शेती करते. आपल्याला काय हवंय यापेक्षा, शेतीला काय हवंय याचा अभ्यास महत्वाचा आहे. जगाच्या पोशिंद्याला ज्या दिवशी सर्वजण मदत करतील तेव्हा शेतीचे अनेक प्रश्न सुटतील, असे मत सिनेअभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने व्यक्त केले.
येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आज शनिवारी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आली असता, आयोजित पत्रकार परिषदेत मृण्मयी बोलत होती. शेतकऱ्यांच्या समस्यावर आधारित आलेल्या सिनेमातून हे प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सुटण्यासाठी ‘डाक्युमेन्ट्री’ तयार करण्याची गरज आहे, असे ती म्हणाली. मालिका, चित्रपट व नाटकांत काम केले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ यासह ‘नटरंग’ या चित्रपटात प्रमुख भूमिका मी केल्या आहेत. आपला अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीला उरतोय, हे बघून मनस्वी आनंद होत असल्याचे तिने सांगितले. मराठी चित्रपटात कलाकार खरोखरच प्रामाणिकपणे जीव ओतून अभिनय करतात.
मराठी प्रेक्षकांबद्दल काय म्हणाली?
उत्तम मराठी सिनेमे तयार होत आहे. सध्याची पिढीही चांगल्या पद्धतीने अभिनय करीत आहे. प्रेक्षकांची सहकार्य आणि इंडस्ट्रीची साथ महत्वाची आहे. आपल्याकडे हिंदीसोबत इतर भाषिक चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. काळ पुढे जातो तसी आवड बदलत. मराठी प्रेक्षक सर्वसमावेश असला तरी त्यांचा कल मराठी चित्रपटापेक्षा इतर चित्रपटाकडे अधिक वळला आहे, असे मृण्मयी म्हणाली.
कलाकारांची जबाबदारी वाढली
रसिकही आता समजूतदार झाले आहेत. त्यामुळे कलाकारांची जबाबदारी अधिक वाढली आहे. वेगवेगळ्या भागात फिल्मसिटी तयार होत आहे. ही चांगली बाब आहे. यातून रोजगारनिर्मीती होणार असून मुंबई बाहेर कलाकारही आनंदाने शुटींगला जातील, असा विश्वास मृण्मयीने व्यक्त केला. यावेळी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. शीतल वातीले प्रामुख्याने उपस्थित होते.