नागपूर : असंघटित कामगार म्हटले की कृषी, बांधकाम, कारखान्यात काम करणारे कामगार डोळ्यापुढे येतात. मात्र राज्य शासनाने ६ जुलै रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, ३४० व्यवसायांतील असंघटित कामगारांचे विविध क्षेत्रात वर्गीकरण करून त्याची ३९ गटांत विभागणी करण्यात आली आहे. यात खासगी शिकवणी वर्गातील शिक्षक, जीममधील प्रशिक्षक, खासगी कंपन्यांतील लेखापाल, रोखपाल, पॅथॉलॉजीतील सहाय्यक व व्यावसायिक सेवा देणाऱ्या कंपन्यांतील वकिलांचाही समावेश आहे.
करोना काळात असंघटित कामगारांच्या मोठ्या संख्येने झालेल्या स्थलांतरणानंतर केंद्र सरकारने या कामगारांची संगणकीकृत नोंद ठेवण्याचे आदेश सर्व राज्य सरकारांना दिले होते. त्यानुसार राज्याच्या कामगार मंत्रालयाने कामगारांचे व्यवसाय व रोजगाराचे वर्गीकरण केले. या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला असून राज्यातही यासाठी सामाजिक सुरक्षा मंडळ आहे. ‘ई-श्रम’ पोर्टलवरील ३१ मे २०२३ पर्यंतच्या नोंदणीनुसार, राज्यात १ कोटी ३६ लाख २८ हजार असंघटित कामगार आहेत. ते काम करीत असलेल्या ३४० व्यवसायांमध्ये वर्गीकरण करून याची ३९ गटांत विभागणी करण्यात आली. त्यात कुठल्या गटात कोणता रोजगार करणारे असंघटित कामगार आहेत हे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा – दुचाकीचालकांनो सावधान! गोंदिया जिल्ह्यात आजपासून हेल्मेटसक्ती, तीन दिवस समुपदेशन, नंतर…
त्यानुसार अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात ऑनलाईन सेवा देणारे कर्मचारी, खासगी शिकवणी वर्गातील शिक्षक, केंद्र व राज्य शासनातील अंशकालीन कर्मचारी, खासगी कार्यालयातील लेखापाल, रोखपालासह इतर लिपिक, विमा एजन्ट, ई-कॉमर्स कंपन्यातील कर्मचारी इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमधील पत्रकारांसह इतर कर्मचारी, आयटी क्षेत्रातील कंपन्यांतील कर्मचारी, पॅथॉलॉजीतील सहाय्यक व इतर कर्मचारी, रुग्णालयातील कंपाऊंडर यांच्यासह खासगी बांधकाम कंपन्यांमधील अभियंत्यांचाही असंघटित कामगारांमध्ये समावेश आहे.