चंद्रशेखर बोबडे

नागपूर : वाहन इंधनाच्या किमती वाढत असल्याने विजेवर धावणाऱ्या, ‘सीएनजी’ व तत्सम पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात तीन वर्षांत ६ हजार १२६ पंपांवर पेट्रोल, डिझेल व्यतिरिक्त किमान एक पर्यायी सुविधा आहे. यात महाराष्ट्राचा वाटा ६९० पंपांचा आहे.  

पेट्रोल, डिझेलऐवजी ‘सीएनजी’, ‘एलएनजी’, विजेवर धावणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारचे आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार २०१९ मध्ये सरकारच्या दिशानिर्देशानुसार तेल कंपन्यांना पारंपरिक इंधनांव्यतिरिक्त त्यांच्या प्रस्तावित किरकोळ ‘आऊटलेट’वर किमान एक नवीन पर्यायी इंधनाची सुविधा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२२ पर्यंत देशात ४ हजार ५८६ पंपांवर सीएनजी व तत्सम तर १५७८ पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिग सेंटरची सुविधा उपलब्ध झाली आहे.

महामेट्रोचा पुढाकार..  इंधनाच्या पर्यायी सुविधेबाबत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून तेथे ६४३ ठिकाणी किमान एक पर्यायी सुविधा उपलब्ध असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने यासंदर्भात दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. नागपूरमध्ये शहरात एक व बाहेर तीन असे एकूण चार ‘सीनएजी’चे पेट्रोल पंप आहेत. महामेट्रोने त्यांच्या काही स्थानकांवर बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांसाठी ‘चार्जिग पॉइंट’ लावले आहेत.

Story img Loader