भंडारा: वैनगंगा नदीवरील ९० वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन कारधा पुल धोकादायक अवस्थेत असून या पुलाची कालमर्यादा संपली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या पुलावरून वाहतुकीस निर्बंध घातले असून पोलीस प्रशासनाचे बरिकेट्स सुध्दा लावण्यात आले आहे. मात्र तरी देखील रात्रीच्या वेळी या धोकादायक पुलावरून छुप्या पद्धतीने वाहतूक सुरू असून सध्या हा पूल अनेक अवैध धंद्यांचा अड्डा बनला आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैनगंगा नदीवरील लहान पूल ब्रिटिशांनी १९२९ मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजूलाच नवीन पूल बांधण्यात आला. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक नवीन पुलावरून सुरू आहे. परंतु, नवीन पूल तयार झाला तरी आजही लोक रात्रीच्या वेळी या पुलावरून छुप्या रितीने वाहतूक करीत आहेत. ६ वर्षांपूर्वीपासून जिल्हाधिकारी यांनी या पुलावरून वाहतुकीस मनाई असल्याबाबत अधिसूचना फलक लावले आहे. मात्र तरीही प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही या पुलावरून छुप्या मार्गाने वाहतूक केली जाते. हा जुना पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे.

हेही वाचा… नोकरभरती सुरू असताना ‘बार्टी’च्या ७५ हजार विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण बंद; शासनाकडून विधानसभेत दिशाभूल करणारे उत्तर

पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले असून सुरक्षा कठडेही तुटले होते. गोसे प्रकल्प झाल्यानंतर पाण्याची पातळी पुलापर्यंत राहते. पावसाळ्यात तर वैनगंगगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते आणि हा पूल पाण्याखाली बुडतो. यापूर्वीही अनेकदा पुराचे पाणी पुलावरून गेले आहे. सध्या पाण्याची पातळी अगदी जवळ असून अशा परिस्थितीतही कारधा व परिसरातील नागरिक याच पुलाचा वापर करीत आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी पोलीस नसतात. त्यामुळे पुलावर जुगाराचे डाव खेळले जातात, मद्यपींची मैफिल सुध्दा याच ठिकाणी रंगते. अंधाराचा फायदा घेत प्रेमी युगुल सुध्दा या पुलावर हमखास दिसून येतात. रात्री बरिकेट्स बाजूला करून अवैध वाहतूकही याच मार्गाने केली जाते. मात्र या सर्वांकडे जिल्हा आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून यावर अंकुश कोण लावणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा… नागपूर: माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा तरुणीवर बलात्कार

ऑगस्ट २०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. भंडारा जिल्हा प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर अशीच घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Although the kardha bridge is dangerous traffic is being carried out secretly on this dangerous bridge at night in bhandara ksn 82 dvr
Show comments