वाशीम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या मार्गाचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. परंतु वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार ते रीधोरादरम्यान एका लेनकडील पूल व रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तसेच पेट्रोल पंप व इतर सोई-सुविधांची कोणतीच व्यवस्था उपलब्ध नसताना लोकार्पणाची घाई का ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकारच्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यातच वाशीम जिल्ह्यातून जाणाऱ्या एका लेनवरील पूल व रस्त्याचे काम सुरूच आहे. असे असतानाही सरकारकडून लोकार्पणाची तारीख जाहीर करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी, आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ते शिर्डीदरम्यान समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.
हेही वाचा: कुठे होणार समृध्दी महामार्गाचा उद्घाटन सोहळा?
वाशीम जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झाले नसून एका बाजूचे काम सुरूच आहे आणि ह्या द्रुतगती मार्गावर जर अर्धवट पुलाच्या बाजूला एकेरी वाहतूक वळवण्यात आली तर अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे अपूर्ण काम कधी पूर्ण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मार्गावर पेट्रोल पंप नाही तसेच इतर सोई-सुविधा अपुऱ्या असताना अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.