नागपूरच्या वज्रमूठ सभेसाठी अधिकाधिक गर्दी व्हावी म्हणून संयोजक, माजी मंत्री सुनील केदार पेटून उठले आहे. निरीक्षक नेमून आढावा घेतला जात आहे. जो दाद देत नाही अशा नेत्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष पटोलेंकडे पाठविला जात आहे.असे असूनही आर्वीची जबाबदारी असणारे माजी आमदार अमर काळे यांनी एकाही पूर्वतयारी बैठकीस हजेरी लावली नाही. ते बेधडक मतदारसंघात व्यस्त असल्याचे सांगून टाकतात. पहिली बैठक आमदार रणजीत कांबळे यांनी घेतली. त्यावेळी ते नव्हते.
हेही वाचा >>>अकोल्यातील मंदिर दुर्घटनेत अंधश्रद्धेचे बळी, ‘अंनिस’चा आरोप; “असाध्य आजार बरे करण्याच्या नावावर…”
मात्र सभेत उपस्थित त्यांच्या गटाच्या नेत्याने गाड्या कोण देणार असा प्रश्न केल्यावर कांबळे यांनी, “तेरा नेता देख लेंगा” असे टोलवले होते. मुळात कांबळे विरुद्ध इतर अशी काँग्रेसची गटबाजी उघड असल्याने काळेच नव्हे तर शेखर शेंडे पण फिरकले नव्हते. नंतर खासदार धानोरकर यांनी घेतलेल्या सभेत पण काळे हजर नसल्याने काळे यांचे करायचे काय, असा प्रश्न चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, प्रत्यक्ष उपस्थिती असणे, नसणे दुय्यम आहे. सभेसाठी कोण किती कष्ट घेणार हे महत्त्वाचे. किती आणणार हे सांगणार नाही. पण जिल्ह्यातून नेहमीप्रमाणे सर्वाधिक कार्यकर्ते आर्वीतून जाणार, हे लिहून घ्या. आर्वीचे काँग्रेस प्रेम व माझ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी सभेत दिसेलच.