वर्धा: आगामी विधानसभा निवडणुकीत मोर्चेबांधणी करण्यात महाविकास आघाडी सरसावली आहे. जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी व आर्वी या चारही मतदारसंघवार काँग्रेसने दावा ठोकला. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने देवळी वगळून उर्वरित ठिकाणी लढण्याची घोषणा केली आहे. त्यातच डॉ. उदय मेघे यांनी काका दत्ता मेघे यांचा भाजप परिवार सोडून काँग्रेसकडून लढण्याची तयारी चालविली. उमेदवारी पक्की असल्याचे गृहीत धरून ते शनिवारी संपर्क कार्यालयाचे उदघाटन करणार. मात्र ही खात्री कशी, असे विचारल्या जाते. या अनुषंगाने अमर पॅटर्न चर्चेत आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस निष्ठावंत असलेल्या अमर काळे यांना पक्षात वेळेवर घेत वर्ध्यातून लढविण्यात आले होते. तसेच काँग्रेस गढ समजल्या जाणारा वर्धा लोकसभा मतदारसंघ पण हातून गेल्याने काँग्रेसी नाराज झाले होते. आता डॉ. उदय मेघे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देत लढविण्याचा व्युह ऐकायला मिळाला. खुद्द मेघे म्हणतात की मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढण्यास ईच्छुक आहे.

हे ही वाचा…

जर राष्ट्रवादीने मला उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली व काँग्रेसने त्यास संमती दिली तर मी आघाडीतर्फे लढणार. अशी स्पष्ट भूमिका डॉ. मेघे यांनी लोकसत्ताकडे मांडली. यामागे एक सूत्र आहे. खासदार अमर काळे व उदय मेघे यांचे कट्टर मैत्र आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे खा. काळे यांचे मामा. त्यांचे दत्ता मेघे कुटुंबाशी वैर. यातूनच मेघे यांना इंगा दाखविण्यासाठी उदय मेघे यांना वर्धेतून लढविण्याचा व राष्ट्रवादीस एक जागा मिळवून घेण्याचा हेतू असल्याचे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने नमूद केले. उदय मेघे यांचे काँग्रेसमध्ये येणे अनेकांना रुचले नाही.

अशोक शिंदे यांच्या प्रमाणेच नाना पटोले यांनी मेघे यांचा परस्पर पक्षप्रवेश करवून घेतल्याची बाब जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना खटकली. अश्या नाराज काँग्रेस नेत्यांचे सहकार्य मिळणार कसे, असा प्रश्न राजकीय वर्तुळत उपस्थित केल्या जातो. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर म्हणाले की वर्धा काँग्रेसच लढणार. पण जर अमर पॅटर्न अंमलात आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला तर जनता ते खपवून घेणार नाही.

हे ही वाचा…

प्राप्त माहितीनुसार उदय मेघे यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र त्यास दुजोरा भेटला नाही. सागर मेघे यांनी तर उदय हे पक्ष सोडून गेल्यानंतर त्यांचा पराभव करण्यासाठी वर्धेत तळ ठोकून बसणार, असे जाहिर करीत भाजप निष्ठा जाहिर केली. आता पवार कुटुंबाशी सौख्य राखून असल्याने डॉ. उदय यांची उमेदवारी जर राष्ट्रवादी कडून आली तर मेघे कुटुंबाचा पेच मात्र वाढणार, अशी चर्चा होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amar kale pattern in discussion at wardha district for forth coming assembly election pmd 64 sud 02