लोकसत्ता टीम
अमरावती: अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीत परंपरागत प्रतिस्पर्धी आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने तिसरे पॅनल आणल्याने मतविभागणीची शक्यता वर्तवली जात आहे.
सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील अकरा जागांपैकी सात जागांवर थेट तर चार जागांवर तिहेरी लढत होत आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या थेट हस्तक्षेपाने समीकरणे बदलली आहेत. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेलच्या विरोधात रवी राणा यांच्या शेतकरी पॅनलने झुंज देण्याची तयार केली असतानाच ठाकरे गटाने बळीराजा पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीत रंगत आणली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, सहसंपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी या पॅनेलचे नेतृत्व करीत आहेत.
आणखी वाचा- अकोला : प्रस्थापितांपुढे नवख्यांचे आव्हान, सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग
ठाकरे गटाने यापूर्वी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षासोबत हात मिळवून पॅनेल मैदानात आणण्याचे प्रयत्न केले होते. मात्र याची तक्रार संपर्क नेते खासदार अरविंद सावंत यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी स्वतंत्र पॅनल लढविण्याची मुभा देत प्रहारसोबत कोणत्याही स्थितीत हातमिळवणी करायची नाही, असा आदेश देण्यात आल्याने तिसऱ्या पॅनलचा उदय झाला. बळीराजा पॅनलने दहा उमेदवार रिंगणात आणले आहेत.
गतवेळी संचालक मंडळात सहा उमेदवार शिवसेनेचे होते. यावेळी महाविकास आघाडी असताना केवळ दोन जागा देण्यात आल्या. जागावाटपात हा अन्याय झाल्याने त्याविरोधात आम्ही बळीराजा पॅनल तयार करून दहा उमेदवार रिंगणात उतरविल्याचे या गटाचे म्हणणे आहे.
आणखी वाचा-राणा दांम्पत्याची राजकीय वाटचाल काटेरी वळणावर?
माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, सुनील वऱ्हाडे, प्रीती बंड व नाना नागमोते महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे नेतृत्व करीत आहेत. तर त्यांच्या विरोधात आमदार रवी राणा, सहकार नेते विलास महल्ले, प्रकाश साबळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, किरण पातुरकर हे शेतकरी पॅनलचे नेतृत्व करीत आहेत.
राजकीय क्षेत्रात आमदार यशोमती ठाकूर व आमदार रवी राणा हे परंपरागत विरोधक आहेत. सहकार क्षेत्रातही त्यांनी ही प्रतिमा आता स्थापन केली आहे. आमदार राणा यांचे बंधू या निवडणुकीत सभापतिपदाचा चेहरा बनले आहेत. त्यामुळे बहुमत मिळवण्यासाठी आमदार राणा यांचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत.
व्यापारी अडते मतदार संघातही चूरस
बाजार समितीच्या व्यापारी अडते मतदारसंघात दोन जागांसाठी चार उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. यातील तीन उमेदवार माजी संचालक असून एक चेहरा नवीन आहे. व्यापारी अडते मतदारसंघात दोन जागा असून त्या पॅनलविरहित असतात. त्यामुळे या मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार उभे राहतात. अमरावती बाजार समितीच्या रिंगणात या मतदारसंघात सात उमेदवार असून सतीश अटल, प्रमोद इंगोले व परमानंद अग्रवाल हे माजी संचालक आहेत. तर, राजेश पाटील, अनिल जेठाणी व रणजीत खाडे पहिल्यांदाच नशीब अजमावत आहेत.