अमरावती : अप्पर वर्धा धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी रविवारी फुटली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे शहराचा पाणीपुरवठा ८ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होण्याची शक्यता आहे.
बोरगाव धर्माळेनजीक अप्परवर्धा धरणाची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. परिसरात तलावसदृश स्थिती निर्माण झाली असल्याने दुरूस्तीतही अडथळे येत आहे. जीवन प्राधिकारणाचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार घटनास्थळी पोहचले असून जलवाहिनीच्या आजूबाजूला साचलेले पाणी काढण्याचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले आहे. किमान पाच दिवस दुरुस्तीला लागणार असल्याने ८ डिसेंबरपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची सूचना विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा: व्हीव्हीआयपींच्या पाहणी दौऱ्याच्या दिवशीच अजगराकडूनही समृद्धीची ‘पाहणी’
अप्पर वर्धा धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी १५०० मिमी. व्यासाची मोठी जलवाहिनीला रविवारी गळती होऊन ती फुटली. त्यामुळे पाण्याचा अपव्यय सुरू होता. आजूबाजूला तलावसदृश स्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार बोरगाव धर्माळे येथे पोहचले. मात्र पाणी साचल्याने दुरुस्तीसाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. किमान पाच दिवस दुरुस्तीला लागणार असल्याचा अंदाज आहे. ९ डिसेंबरला पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र पाच दिवस पाण्यासाठी अमरावतीकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.