नागपूर: शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेणार होते. मात्र, ही भेट स्थगित झाली. त्यावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, “दिल्लीतील राज्य सरकारचे महत्त्व यावरून लक्षात आले आहे”, असे टोला शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात एक अहवाल पुढे आला आहे. त्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत २ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. हे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही आणि मदत देईल, असेही वाटत नाही. सरकार शेतकऱ्यांविषयी खोटारडी भूमिका घेत आहे. कांदा निर्यातबंदी, इथेनॉल आणि इतर प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री दिल्लीत अमित शहा यांना भेटणार होते. परंतु, तेही यांना वेळ देत नाही. त्यामुळे दिल्लीदरबारी यांचे महत्त्व किती आहे, हे कळते, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
हेही वाचा – कांदा, इथेनॉल प्रश्नावर अमित शहांची भेट लांबणीवर; अजित पवार म्हणाले…
कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉलमुळे उस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर आधारित कारखानदारीदेखील अडचणीत आहे. आठ दिवसांपासून यावर तोडगा निघालेला नाही, हे दुर्दैव आहे.
हेही वाचा – सरकारकडून बेरोजगारांची थट्टा : आमदारांनी विधानभवनाच्या पायरीवर तळली भजी
मुदतीतच निर्णय व्हावा
आमदार अपात्रताप्रकरणी निर्णय घेण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे. या मुदतीतच विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. परंतु, पुन्हा अध्यक्षांनी मुदतवाढीची विनंती न्यायालयात करणे चुकीचे आहे, असे दानवे म्हणाले.