बुलढाणा : जिथे न्याय मिळायला हवा तिथे न्याय मिळत नाही म्हणून आम्ही जनतेच्या दरबारात जात आहोत. महापत्रकार परिषद असो वा जनता दरबार हा त्याचाच एक भाग आहे. यावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे खुले आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे.
बुलढाणा बाजार समितीमध्ये आज, बुधवारी (दि. १७) आयोजित जनाधिकार (जनता दरबार) कार्यक्रमादरम्यान अंबादास दानवे यांनी माध्यमाशी संवाद साधताना राज्यशासन, मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत खुलासे केले. मुळात न्यायनिवाडा करणारी कोणतीही व्यक्ती खुलासे करीत नाही. मात्र, ते खुलासे करतात म्हणजे त्यांनी चूक केली असाच अर्थ होतो, असे सांगतानाच शिंदे गटाचे आमदार अपात्र होणारच, असा दावाही अंबादास दानवे यांनी केला.
हेही वाचा >>>‘आम्हाला रश्मीताईंकडून कानमंत्राची गरज नाही” काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?
दावोसला ७० जणांचे शिष्टमंडळ नेण्याची गरजच काय?
बहुचर्चित दाओस दौऱ्यात ७० जणांचे शिष्टमंडळ नेण्याची गरजच काय? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. इतक्या व्यक्तींना तिथे नेण्याची गरज नसून फारतर सातजण पुरेसे आहेत. या दौऱ्यातून महाराष्ट्राच्या पदरी फारसे काही पडणार नाही. काही आले तरी ते गुजरातला कधी जाईल याचा नेम नाही, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुळातच बिनकामी आहे. प्रमाणपत्रे वगैरे वाटणे हे मंत्र्यांचे काम नव्हे, अशी टीकाही अंबादास दानवे यांनी केली.
बुलढाण्यावर आमचाच हक्क
बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, बुलढाणा मतदारसंघात १९९६ पासून शिवसेना जिंकत आली आहे. यामुळे या मतदारसंघावर आमचाच हक्क आहे. आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी बुलढाणा आमचेच आहे, असे त्यांनी ठासून सांगितले. मित्रपक्षाला मागणी करण्याचा अधिकार आहे, पण बुलढाण्यावर आमचाच हक्क आहे. उमेदवार कोण हे उद्धव ठाकरेच ठरवतील असेही अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.