नागपूर : भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात आता दम (राजकीय शक्ती) राहिला नाही. त्यामुळे त्यांना बाहेरच्या पक्षातून नेते आणावे लागतात, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला.
नागपुरातील अंबाझरीसह पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर ते पत्रपरिषदेत बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच राज्यात अनेक नेते भाजपामध्ये येणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर दानवे म्हणाले, भाजपामध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. त्यामुळेच त्यांना बाहेरच्या पक्षातून नेते आयात करावे लागते. परंतु भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी शेवटी जनता त्यांना उत्तर देणार आहे.
हेही वाचा – नागपूर : दोनशे ‘लॅपटॉप’ निकामी, नेमके घडले काय ?
सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार-खासदारांना लोक गद्दार-खोकेबाज म्हणून ओळखतात. त्यामुळे त्यांची प्रतिमाच नसल्याने त्यांच्या बदनामीचा प्रश्नच काय? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. सरकारने ५० टक्यांची मर्यादा हटवून मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यायला हवे. त्यांच्या आरक्षणाने ओबीसी वा इतरांना फटका बसू नये, असेही दानवे म्हणाले.