नागपूर: सत्ताधारी काही आमदारांकडून सातत्याने दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली जात आहे. ही चौकशी करा, पण उपराजधानीत न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणाची एसआयटी लावावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.
सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून सातत्याने दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटीद्वारे चौकशीची मागणी होत आहे. प्रत्यक्षात या प्रकरणी अनेक चौकशा झाल्या आहेत. त्यात काहीही आढळलेले नाही. दिशा सालियान यांच्या कुटुंबीयांचीदेखील काही तक्रार नाही. चौकशीच करायची असेल तर नागपुरात न्यायाधीश ब्रिजगोपाल हरकिशन लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांच्याही कुटुंबीयांची या प्रकरणात काही तक्रार नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूची एसआयटी करून सत्य बाहेर यावे, असे अंबादास दानवे म्हणाले.
अडीच वर्षे सत्तेत असताना काय केले? – नितेश राणे
दिशा सॅलियनप्रकरणी सरकारने एसआयटी गठीत केली आहे. त्यापूर्वी अडीच वर्षे तुमची सत्ता होती. तेव्हा तुम्ही न्यायमूर्ती लोया प्रकरणी एसआयटी का लावली नाही, असा सवाल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या घरी झालेल्या पार्टीची माहिती अनिल परब यांनी दिली होती. तसेच या प्रकरणी मी जे आरोप करतोय, त्यावरील चौकशीसाठी मलादेखील बोलवावे. जेणेकरून ‘दुधका दुध और पानीका पानी’ होईल, असेदेखील आमदार नितेश राणे म्हणाले.