अमरावती : कुलस्वामिनी अंबोदवी आणि एकवीरा देवी मंदिरात नवरात्रौत्सवाला १५ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. दोन्ही मंदिरांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात मंदिराच्या परिसरातील यात्रेचेही आकर्षण असते. त्यासाठी दुकानदारांची लगबग सुरू झाली आहे.
१५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना केली जाईल. या दिवसापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून २४ ऑक्टोबर रोजी विजयादशमी आहे. या दिवशी दोन्ही देवी या सीमोलंघनाला निघतात. यावेळी शिलांगण मार्गावर पालखी यात्रा असते. अगदी घटस्थापनेपासून ते सीमोलंघन पालखी यात्रेपर्यंतचे नियोजन करण्यात श्री अंबादेवी संस्थान, श्री एकवीरा देवी संस्थान सध्या व्यस्त आहे. दोन्ही मंदिरात दर्शनासाठी पुरुष व महिलांच्या वेगळ्या रांगा राहणार असून पोलिस बंदोबस्तही चोख ठेवला जाणार आहे.
हेही वाचा >>> मालमत्ता करवसुलीच्या वादात विरोधी पक्षनेत्यांची उडी; वसुलीच्या कंत्राटीकरणावर टीका; करवसुली थांबवण्याबाबत…
नवरात्रोत्सवात राजकमल चौकापासून ते श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी मंदिरापर्यंत मोठी जत्रा भरते. हार, फुले, प्रसादाच्या दुकानांसोबतच विविध वस्तूंची दुकाने, खेळणी रस्त्याच्या दुतर्फा दृष्टीस पडतात. वाहनांसाठी हा मार्ग बंद असतो. भाविकांना राजकमल चौकापासून मंदिरापर्यंत तसेच रवीनगर रस्त्याने भुतेश्वर चौकापासून पायी यावे लागते. श्री अंबादेवी मंदिरात नवमीला महाप्रसाद असतो तर श्री एकविरा देवी मंदिरात सुक्या मेव्याचा प्रसाद भाविकांना अष्टमीच्या दिवशी वाटला जातो.
हेही वाचा >>> बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी सक्रिय; तीन उपविभागीय अधिकाऱ्यांची चौकशी
तसेच दोन्ही मंदिरात अष्टमीला होमहवन केले जाते. त्यामुळे आतापासूनच होमहवनाच्या जागांची निश्चिती, मंडपांची तसेच रांगांची बांधणी, शामियाना, दुकानांची निश्चिती, चप्पल, जोडे स्टँडच्या जागा, सीसीटीव्ही कॅमेरे अशी व्यवस्था व साहित्याची जुळवाजुळव केली जात आहे. नवरात्रोत्सवात श्री अंबादेवी व श्री एकविरा देवी परिसर विद्युत रोषनाईने न्हाऊन निघतो. तसेच मंदिराच्या आतील भाग, गाभारा सतत स्वच्छ ठेवण्याचे कार्य सुरू असते. मंदिर बाहेरूनच नव्हे तर आतूनही विविध प्रकारच्या फुलमाळा, फुलांचे गुच्छे वापरून सजवले जाणार आहे, अशी माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली.