लोकसत्ता खास प्रतिनिधी
नागपूर : अंबाझरी जैवविविधता उद्यानात अवघ्या वर्षभरातच दुसऱ्यांदा वणवा पेटला असून १०० हेक्टरहून अधिक जंगल जळाले आहे. दुपारी दीड वाजताच्या सुमारास लागलेली आग रात्री उशिरापर्यंत धुमसत होती. अग्निशमन विभागाचे बारा बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फु ले शैक्षणिक परिसराच्या मागील भागात लागलेली आग राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र आणि जैवविविधता उद्यानात पसरली. तीन बंब मागील भागातील आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच वाऱ्यामुळे ती समोरच्या परिसरात पसरली. उद्यान परिसरात तुकडय़ातुकडय़ांमध्ये आग धुमसत असून हवेसह समोर सरकत आहे. ५० कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले होते. जैवविविधता उद्यानाचा हा संपूर्ण परिसर ७५० हेक्टरमध्ये असून त्याचे व्यवस्थापन संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे आहे. मागील वर्षी देखील १२ मे रोजी या उद्यानात आग लागली होती. या आगीत दहा हेक्टर जंगल जळाले होते. उद्यानातील कक्ष क्र . ७९७ मध्ये वासुदेवनगर भागातील वीज मंडळाच्या शंकरनगर टॉवरलाईनमधील एका फिडरवर शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली होती.
१२ बंबांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
आतापर्यंत सुमारे १०० हेक्टर जंगल जळाल्याचा अंदाज आहे. महापालिके च्या अग्निशमन विभागाची नऊ तर एमआयडीसीची दोन आणि वाडीचा एक बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
– डॉ. प्रभूनाथ शुक्ल, उपवनसंरक्षक (प्रादेशिक).
सुरक्षिततेच्या नावाखाली असंख्य त्रुटी
नैसर्गिक जैवविविधता नष्ट करून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी समस्त पक्षीप्रेमींनी या उद्यानाला विरोध के ला होता. उद्यानाच्या रूपाने या जंगलाचे व्यावसायिकीकरण करण्यात आल्याने गेल्या दोन वर्षांपासून याठिकाणी फ्लायकॅ चर, इंडियन पिट्टा यासारख्या पक्ष्यांचे अस्तित्व संपले आहे. मोठय़ा संख्येने आढळून येणाऱ्या मोरांची संख्या कमी झाली आहे. जैवविविधता उद्यान झाले असले तरी सुरक्षिततेच्या नावाखाली असंख्य त्रुटी आहेत.