अबरनाथ : अंबरनाथ विधानसभेची जागा अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आला आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या आपल्या उमेदवारी यादीमध्ये राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. राजेश वानखेडे यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना कडवी लढत दिली होती. अवघ्या काही मतांनी वानखेडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ही जागा ठाकरे गटाला गेल्याने काँग्रेस पक्षातील अनेक इच्छुकांचे हिरमोड झाला आहे. ही जागा गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी लढवली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. यात अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी किणीकर आघाडीवर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ ही एकमेव जागा आहे जी शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही जागा जिंकणे शिवसेना शिंदे गटासाठी महत्त्वाची आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांनी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात चांगली मते घेतली. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथील विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांचा सुमारे ३० हजार मतांनी विजयी झाला. मात्र लोकसभा निवडणुकीत विरोधी उमेदवार वैशाली दरेकर राणे यांना जवळपास ५८ हजार मते मिळाली.

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे मध्यस्थीने अंबरनाथचा तिढा सुटला, विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि अरविंद वाळेकर यांच्यात समेट

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अंबरनाथ शहरात कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराला चांगले मतदान झाल्याचे बोलले जाते. त्या दृष्टीने ही जागा ठाकरे गटाला सुटावी अशी मागणी होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आली होती. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही येथे उमेदवार दिला होता. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी होती. मात्र वाटाघातीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात आली आहे. बुधवारी ठाकरे गटाने आपले उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात अंबरनाथ येथून राजेश वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजेश वानखेडे यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. त्यावेळी वानखेडे यांनी डॉ. बालाजी किणीकर यांना घाम फोडला होता. अवघ्या काही मतांनी वानखेडे यांचा पराभव झाला. त्यामुळे आता पुन्हा २०१४ निवडणुकीसारखीच थेट लढत होणार असल्याने येथे किणीकर यांच्यासमोर मोठे आव्हान असल्याचे मानले जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath assembly seat finally given to shiv senas ubt party sud 02