लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ : रुग्णाला दवाखान्यात घेवून जाणारी धावती रुग्णवाहिका पेटली. चालकाने प्रसंगावधान राखून वाहन थांबविण्याल्याने सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र रुग्णवाहिका जळून नष्ट झाली. ही घटना आज गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास येथील आर्णी मार्गावरील अमृत लॉन समोर घडली.

दिग्रस येथून चालक नीलेश राऊत हे रुग्णवाहिका (क्र. एमएच १४- सीएल ०९०५) मध्ये गर्भवती रुग्णाला घेवून यवतमाळ येथे घेवून येत होते. रुग्णासोबत तिचे नातेवाईक व डॉक्टर आणि नर्स असे पाचजण रुग्णवाहिकेत होते. रुग्णवाहिका यवतमाळ शहरात पोचल्यानंतर अमृत लॉन समोर वाहनाच्या बॉनेटमधून अचानक धूर येत असल्याचे चालकाला दिसले. चालकाने अचानक ब्रेक दाबून वाहन थांबविले, तोपर्यंत वाहनाच्या केबिनमध्ये आग लागली. चालकाने गाडी खाली उडी मारली. रस्त्यावरील नागरिकांनी रुग्णवाहिकेतील लोकांना बाहेर काढले. तोपर्यंत संपूर्ण रुग्णवाहिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलास आगीची माहिती दिली.

आणखी वाचा-चंद्रपूर : ऐन निवडणूकीत भाजपमध्ये ‘आयाराम’ची संख्या वाढली

अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग आटोक्यात आणली. रुग्णास दुसऱ्या रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. दोन आठवड्यापूर्वी धावती कार पेटल्याची घटना कळंब येथे घडली होती. वाढत्या उन्हामुळे वाहन पेटण्याच्या या घटना घडत आहेत. त्यामुळे उन्हात वाहन बाहेर पडताना योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनांवरून दिसून येते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambulance caught fire in yavatmal fortunately four people including a pregnant woman survived nrp 78 mrj