नागपूर : महाल परिसरातील दंगलीत जखमी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यासह इतरही जखमींना मेयो रुग्णालयात हलवण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर तीन रुग्णांना न्यू ईरा रुग्णालयात हलवण्यात येणार होते. त्यापैकी कदम यांना घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेवर दगडफेक झाली. रुग्णवाहिकेच्या चालकाच्या प्रसंगावधानाने कदम थोडक्यात बचावले.

मेयो रुग्णालयात कुऱ्हाडीने हल्ला झाल्यावर सोमवारी रात्री निकेतन कदम यांना जखमी अवस्थेत दाखल केले गेले होते. त्यांना येथे प्राथमिक उपचार दिल्यावर पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून लकडगंज परिसरातील न्यू ईरा रुग्णालयात हलवण्याच्या सूचना मिळाल्या. त्यानुसार मेयो प्रशासनाने एक रुग्णवाहिका उपलब्ध केली. सोबत इतरही दोन रुग्ण त्यानंतर हलवले जाणार होते. ही रुग्णवाहिका लकडगंजच्या दिशेने निघाल्यावर गीतांजली परिसरात रुग्णवाहिकेवर दगडफेक झाली. त्यात रुग्णवाहिकेचे काच फुटले. त्यानंतरही रुग्णवाहिकेच्या चालकाने वाहन न थांबवता तातडीने न्यू ईरा रुग्णालयाच्या दिशेने रुग्णवाहिका नेली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान या घटनेची माहिती मेयो प्रशासनाला कळताच त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय करत त्यानंतरचे इतर काही रुग्ण न्यू ईरा रुग्णालयात पोलीस वाहनातूनच हलवल्याची माहिती मेयोच्या डॉक्टरांनी दिली. दरम्यान सोमवारी रात्री (१८ मार्च) दोन गटात संघर्ष पेटल्यावर जमावाकडून एका उपयुक्तांवर कुऱ्हाडीने तर दुसऱ्या उपायुक्तावर राॅडने हल्ला झाला. एकूण ५५ पैकी इतर जखमींवर दगड व इतर वस्तूने हल्ला झाल्यावर या सर्वांना उपचारासाठी नागपुरातील मेयो आणि मेडिकल या शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले. तर खासगीतही अनेक जखमींवर उपचार होत आहेत. दरम्यान घटनेनंतर मेयो रुग्णालयात रुग्ण वाढत असल्याचे बघत रुग्णालय प्रशासनाने तातडीने अस्थिरोग, शस्त्रक्रिया, कान-नाक-घसा, नेत्ररोग विभागासह इतरही संबंधित विभागातील वरिष्ठ डॉक्टरांना तातडीने रुग्णालयात पाचारण केले.

आकस्मिक अपघात विभाग, शल्यक्रिया विभाग व वार्ड अशा तीन चमू करून रुग्णांच्या मदतीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची सेवा लावली गेली. मंगळवारी पहाटे ३ ते ४ वाजतापर्यंत या रुग्णांवर उपचार सुरू होते. किरकोळ जखमी असलेल्या अनेक रुग्णांनी रात्री उशिरा सुट्टी घेतली. तर पोलीस उपयुक्तांना रात्रीच लकडगंज परिसरातील न्यू ईरा रुग्णालयात हलवण्यात आले.

मेयोच्या डॉक्टरांकडून अविरत सेवा

मेयोतील डॉक्टरांकडून होळी व धूलिवंदनाच्या दिवशी अपघात, अतिमद्यप्राशन, हाणामारीच्या जखमींवर दिवस-रात्र सेवा दिली होती. त्यानंतर सोमवारी दिवसभर सेवा दिल्यावर वरिष्ठ डॉक्टर घरी परतले होते. परंतु, हिंसाचारात मोठ्या प्रमाणात जखमी मेयोत आल्याचे कळताच तातडीने अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शेंडे, अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. मोहम्मद फैजल, डॉ. सागर पांडे आणि सगळ्याच विभागप्रमुखांनी रात्री ९ ते १० दरम्यान पुन्हा मेयो गाठले. सगळ्यांनी मंगळवारी पहाटे ५ पर्यंत रुग्णांना सेवा दिली.

Story img Loader