नागपूर : लोकांनी मनात विचार केला तर ते नक्कीच सत्ता परिवर्तन घडवून आणतात. लोकशाही व्यवस्थेची ही विशेषत: आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मिरमध्येही काँग्रेसला बहूमत मिळणार आहे.
महाराष्ट्रातील जनता भाजप आणि मित्र पक्षाच्या सरकारला त्रासली असून येथील जनतेनेही सत्तापरिवर्तन करण्याचा निर्णय घेतल्याचा विश्वास अमेठीचे खासदार आणि काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांनी व्यक्त केला. नागपूर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली. तसेच २०१९ मध्ये अमेठी लोकसभेत राहूल गांधी यांचा पराभव का झाला? याची कारणेही सांगितली.
मुंबईत राहणाऱ्या इराणींना अमेठी काय कळणार
लोकशाहीमध्ये जनता सर्व काही ठरवत असून महाराष्ट्रातील जनता बुद्धीमान असून काँग्रेसच्या बाजूने त्यांचा कौल असल्याचेही भाकित त्यांनी केले. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावरही टीका केला. मुंबईमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला अमेठी आणि रायबरेलीमधली परिस्थिती काय कळणार? असा प्रश्न उपस्थित केला. गांधी परिवाराचे अमेठीच्या जनतेची १०३ वर्षांपासून संबंध आहेत. देशात इंग्रजांची राजवट असताना १९२१ मध्ये येथील शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहऊ यांनी अमेठीला भेट दिली होती. तेंव्हापासून या परिवाराची नाळ येथील जनतेशी जुळली आहे असेही किशोरीलाल शर्मा म्हणाले.
…म्हणून २०१९ मध्ये राहूल गांधी अमेठीत हरले
स्मृती इराणी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचा २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. या निवडणुकीसंदर्भात किशोरीलाल शर्मा यांनी सांगितले की, निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे नव्हती. त्यावेळी मी रायबरेलीमध्ये होतो. मात्र, पराभवानंतरही अमेठी लोकसभेचे परिक्षण केले असता राहूल गांधी यांना पराभूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सत्तेचा दुरूपयोग करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. काही ठिकाणी आमचे व्यवस्थापन कमी पडल्याचेही त्यांनी मान्य केले.
हेही वाचा >>>दिवाळीआधी हवाई प्रवाशांना खुशखबर! पुणे- भोपाळ दररोज थेट विमानसेवा तर इंदोर, चेन्नई अन् रायपूरसाठीही उड्डाण
कोण आहेत किशोरी लाल शर्मा?
किशोरी लाल शर्मा मूळचे पंजाबच्या लुधियानाचे असून, गांधी घराण्याचे जवळचे सहकारी असल्याचे सांगितले जाते. ते १९८३ मध्ये काँग्रेस कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा अमेठीत आले होते. तेव्हापासून ते माजी पंतप्रधान (दिवंगत) राजीव गांधी यांच्याशी जवळून संबंधित होते आणि अमेठीमध्ये राहिले. जिथे त्यांनी काँग्रेससाठी काम केले. १९९९ मध्ये सोनिया गांधींच्या पहिल्या निवडणूक विजयात नव्याने उतरलेल्या अमेठी उमेदवाराने महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्याद्वारे त्यांनी अमेठीमध्ये विजय मिळवून पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला होता. यंदा त्यांनी स्मृती इराणी यांचा अमेठी येथे पराभव केला.