वाशीम : मोदी आणि शहांचे राजकारण हे द्वेषाचे राजकारण आहे. राज्यातून शिवसेना संपवली यांचा आनंद अमित शहा यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आसुरी आनंद व्यक्त करताना उद्धवचा वध केला आणि आपला अजून एक शत्रू आहे तो म्हणजे वंचित, म्हणून ते आमच्याही मागे लागण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, असे अनेक आले आणि गेले. आम्ही अहो तिथेच आहोत. त्यामुळे आमच्या नादी लागू नका, असा इशारा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
अखिल भारतीय भिख्खू संघाच्या वतीने राजगाव येथे धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. बाळासाहेब आंबेडकर बोलत होते. यावेळी डॉ. सिद्धार्थ देवळे, गजला खान, धवसे, किरण गिऱ्हे हुले यांच्यासह वंचितचे पदाधिकारी, भिख्खू उपस्थित होते. ॲड. आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसच्या काळात निवडणुकीत थोडी दयामाया होती. पण आत्ताचे भाजप सरकार लोकांना विकत घेण्याची भाषा वापरते. हे सरकार व्यापाऱ्यांचे, दलालांचे सरकार आहे. हल्ली धर्माचे राजकारण होत आहे. धर्माचे राजकारण करणारे सत्तेत आले. परंतु, पोटाचा प्रश्न सुटलेला नाही. मोदी- शहा खुनशी हव्यासापोटी दबावतंत्र वापरून विरोधकांना संपवत आहेत. बेरोजगारी, शेती, अशा अनेक विषयावर आंबेडकर यांनी सडकून टीका केली.
भाजपसाठी पन्नास हजार रुपये मत ठेवा
एकनाथ शिंदे आणि भाजपवाले मतदारांना पैशाच्या जोरावर विकत घेण्याची भाषा वापरत आहेत. त्यामुळे मतदारांनी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांना एका मताला पन्नास हजार रुपये द्या, अन्यथा चालते व्हा, असा बोर्ड लावण्याचाही आंबेडकरांनी सल्ला दिला.
हेही वाचा >>> “शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात घेणाऱ्यांचे हातपाय तोडू”; बच्चू कडूंचा इशारा…
फडणवीसांच्या तोंडाचा घास हिरावला
फडणवीस एकेकांना फटाके लावत आहेत. त्यांच्या तोंडचा मुख्यमंत्री पदाचा घास हिरावला म्हणून ते संतप्त राहतात. म्हणून फक्त त्यांच्या सभेत मुख्यमंत्री कोण, अशा घोषणा देऊन बघा, असेही आंबेडकर म्हणाले.