बुलढाणा : महाविकास आघाडी म्हणजे विकास प्रकल्प विरोधी आघाडी आहे. या आघाडीने विकासाला कायम विरोध केला असल्याची टीका भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुष्टीकरणाचे गलिच्छ राजकारण करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने इतर मागासवर्गीय समूहाला आरक्षण देण्यात अगदी नेहरूंच्या काळापासून कडवा विरोध केला असून आजही काँग्रेस ओबीसी विरोधीच असल्याचा घणाघाती आरोपही शहा यांनी केला. यामुळे आघाडीला पराभूत करण्याचे आवाहन करतानाच राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघाचे भाजपा तथा युतीचे उमेदवार माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ आज अमित शहा यांची जंगी प्रचार सभा मलकापूर येथे पार पडली. जनता महाविद्यालयाच्या भव्य मैदानात पार पडलेल्या या सभेला युतीच्या नेत्यांसह कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली. यामुळे ही सभा युतीचे शक्तिप्रदर्शन ठरले.

हेही वाचा – ‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उमेदवार माजी आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय कुटे, आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अमित शहा यांनी महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष आणि अधूनमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना लक्ष्य करीत खरपूस टीका केली.

महाविकास आघाडी म्हणजे विकास विरोधी आघाडी अशी व्याख्या करीत ते म्हणाले की आघाडीने राज्यातील प्रत्त्येक मोठ्या विकास प्रकल्पाला विरोध केला आहे. बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो, कोस्टल रोड असो की धारावी प्रकल्प, वैनगंगा पैनगंगा नदी जोड योजना असो की पुणे आउटर लिंक रोड असो आघाडीने कायम विरोधाची भूमिका घेतली आहे.

विकासाच्या कामात खोडा घालण्याचे पापच केले आहे. तसेच केंद्रात सत्तेत असताना महाराष्ट्र राज्याला निधी देताना आखडता हात घेतला आहे. २००४ ते २०१४ दरम्यान केंद्रात सरकार असताना महाराष्ट्राला किती निधी दिला याचे उत्तर काँग्रेसने द्यावे असे आव्हान मी केले. मात्र काँग्रेसने याचे उत्तर दिले नाहीये. मात्र मी ‘बनिया पुत्र’ असल्याने याचा हिशोबच सोबत घेऊन आलो आहे. काँग्रेसवरील कालावधीत राज्याला १ लाख ९१ हजार कोटींचा विकास निधी दिला.

या तुलनेत भाजप सरकारने २०१४ ते२०२४ दरम्यान राज्याला १० लाख १५ हजार ८९० कोटींचा निधी दिला आहे. युतीच्या जेमतेम अडीच वर्षात काळात झालेली प्रगती शरद पवारांसह आघाडीच्या नेत्यांनी पहावी. त्यांनी विकसित विदर्भ, उत्तर महाराष्ट्र पाहावं असे खुले आव्हान त्यांनी दिले. तुमच्या चार पिढ्या आल्या तरी आरक्षण आणि कलम ३७० कलम रद्द होणे नाही.

हेही वाचा – महाविकास आघाडीचा जाहीरनामा केवळ घोषणा, बावनकुळेंची टीका

काँग्रेस सुरुवातीपासूनच ओबीसी आरक्षणच्या विरोधात आहे. पंतप्रधान नेहरू यांनी ओबीसींना आरक्षण देण्याची शिफारस करणारा काकासाहेब कालेलकर समितीचा अहवाल दाबून ठेवला. इंदिरा गांधींनी मंडल आयोगाचा अहवाल थंड बस्त्यात ठेवला. याउलट नरेंद्र मोदींनी ओबीसींना आरक्षणाची व्याप्ती वाढविली. सर्व संस्थांत २७ टक्के आरक्षण दिले, मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक संस्थाचा दर्जा दिल्याचे गृहमंत्री शहा म्हणाले.

सोमनाथ मंदिर सोन्याचे

मुस्लिम उलेमांच्या शिष्टमंडळाने नुकतेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नांना पटोले यांची भेट घेतली. मागास जातींचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना लागू करण्याची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र काळजी करू नका असे सांगून त्यांच्या चार पिढ्या जरी आल्या तरी कुणाचेही आरक्षण काढू देणार नाही. ३७० कलम परत लागू करू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.आपण संसदेत ३७० कलम हटवायचे बिल सादर करीत असताना राहुल बाबा (गांधी) , शरद पवार, ममता दीदी, अखिलेश यादव यांनी त्याला विरोध केला. असे केल्यास काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील असा इशारा दिला. मात्र पाटच काय दगडही आला नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. औरंगजेबाने काशी विश्वनाथ कॉरिडॉर उद्ध्वस्त केला होता तो नरेंद्र मोदी यांनी बांधला. काँग्रेसने रखडविलेला अयोध्या राम मंदिर प्रश्न सोडविला. पाच वर्षात निकाल लावला, भव्य मंदिर बांधले, आणि तिथे रामलल्लाना विराजमान केलं. आता सोमनाथ मंदिर सोन्याचे करणार अशी घोषणा त्यांनी दिली.

लढाई शिवराय आणि अफझलखान वृत्तीतील

राज्य विधानसभेची यंदाची लढाई शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालणाऱ्या युती आणि अफझलखान वृत्तीच्या आघाडीमधील लढाई आहे. मतदारांनी अफजलखानाच्या मार्गावर चालणाऱ्या महाविकास आघाडीला पराभूत करण्याचे आवाहन शहा यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah malkapur chainsukh sancheti campaign amit shah criticizes mahavikas aghadi amit shah talk on ladki bahin yojana scm 61 ssb