यवतमाळ : काँग्रेसनेते राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे मुस्लीमधार्जिणे नेत आहेत. काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा जाणीवपूर्वक रखडत ठेवला. त्यांना मस्जिदींच्या विकासासाठी एक हजार कोटी रूपये द्यायचे आहेत, असा आरोप करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण देणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमरखेड येथे महायुतीचे उमेदवार किसन वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी बोलताना अमित शहा यांनी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे आता अयोध्येला जाण्याऐवजी मस्जिदीत जाण्यात धन्यता मानतात. हे नेते मतांसाठी मुस्लिमांच्या अटीशर्ती मान्य करत आहेत. मौलवींना दरमहा १५ हजार वेतन, मस्जिदींच्या विकासासाठी एक हजार कोटींचा निधी, मुस्लीम आरक्षणास अनुकूल आहेत. मात्र भाजप हे होवू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मुस्लीमांना कदापी आरक्षण मिळू देणार नाही म्हणजे नाही, असे शहा म्हणाले.

हेही वाचा…गडचिरोलीच्या विकासकामांना वन विभागाचा सर्वात मोठा अडथळा : नितीन गडकरी

वक्फ बोर्डाचे कायदे बदलवण्यास काँग्रेससह त्यांच्यासोबतचे नेते विरोध करत आहेत. मात्र भाजप जे ठरवते ते काळया दगडावरची रेष असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी वक्फ बोर्डाचे कायदे बदलवून दाखवतील, असा दावा शहा यांनी केला. काश्मिरमध्ये ३७० कलम परत लागू करण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. मात्र राहुल गांधींच्या चार पिढ्यांना हे शक्य होवू देणार नाही, असे शहा यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे हे त्यांचीच शिवसेना खरी असल्याचे म्हणतात. पण खरी शिवसेना भाजपसोबत असून ठाकरेंची उद्धवसेना झाली आहे. त्यांची खरी शिवसेना असती तर त्यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर या शहरांची नावे बदलण्यास विरोध केला नसता, असे शहा म्हणाले. राहुल गांधी यावेळीसुद्धा अपयशी होतील, असे त्यांनी सांगितले. आपले एक मत भारताला समृद्ध करेल. शेतकरी, महिला, युवकांना बळकट करेल. मोदींनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध करण्याचे काम केले. त्यामुळे महायुतीला साथ देवून महाराष्ट्राचा विकास आणि समृद्धीला गतीमान करा, असे आवाहन अमित शहा यांनी केले.

हेही वाचा…भाजप आमदाराचा थेट काँग्रेस उमेदवाराला आशीर्वाद… मध्य नागपूरात…

उमरखेडकरांना आश्वासने

उमरखेडला समृद्धी महामार्गाशी थेट जोडले जाईल, तसेच वर्धा-नांदेड हा रेल्वेमार्ग पुढील पाच वर्षात पूर्ण केला जाईल, असे ते म्हणाले. उमरखेडची जीवनवाहिनी असलेल्या पैनगंगा नदीचा नदीजोड प्रकल्पात समावेश करण्याची ग्वाही यावेळी अमित शहा यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah opposes muslim reservation in chhatrapati shivaji maharajs maharashtra nrp 78 sud 02